निपाणीचे पहिले आयपीएस अधिकारी संजय माने यांचे निधन | पुढारी

निपाणीचे पहिले आयपीएस अधिकारी संजय माने यांचे निधन

निपाणी : पुढारी वृत्तसेवा : निपाणीतील प्रगतीनगर येथील रहिवासी पहिले निवृत्त आयपीएस अधिकारी संजय वसंतराव माने (वय ६१) यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराने निधन झाले. सध्या ते इंदौर (मध्यप्रदेश) येथे वास्तव्यास होते. त्यांना दोन वेळा राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणल्यानंतर बसवानगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. माने हे कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित होते.

संजय माने यांचे मुळगाव मलिकवाड (ता.चिकोडी) असून ते गेल्या ३६ वर्षापासून पोलीस खात्यात सेवेत होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण जत्राटवेस तर माध्यमिक शिक्षण विद्यामंदिर तर महाविद्यालयीन शिक्षण देवचंद कॉलेज अर्जुननगर येथे झाल्यानंतर त्यांनी पुढील पदवीचे शिक्षण सुरतकल (मंगळूर) येथे घेतले होते. ते सन १९८९ मध्ये पोलीस खात्यात रुजू झाले होते. त्यांची मुंबईसह भोपाळ, मध्यप्रदेश, ग्वाल्हेर, रतलाम, छिंदवाडा, सागर येथे सेवा झाली असून गतवर्षी ते इंदौर येथून उपपोलीस महानिर्देशक (एडीजेपी) या पदावरून निवृत्त झाले होते.

सोमवारी रात्री त्यांना इंदौर येथे त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थीव सायंकाळी ६ वा. निपाणी प्रगतीनगर येथील निवासस्थानी दर्शनासाठी ठेवल्यानंतर ७ वा. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. माने हे परिवर्तन चळवळीचे प्रा.डॉ.अच्यूत माने यांचे पुतणे तर निपाणी नगरपालिकेचे माजी सभापती अजय माने यांचे बंधू होत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात सर्व स्तरातील मान्यवरांनी दिवसभर त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

दरम्यान, संजय माने यांचा १७ नोव्हेंबर रोजी वाढदिवस साजरा होणार होता. यावेळी ते गावी येणार होते. त्याआधीच त्यांचे निधन झाल्याने त्यांची गावाकडे येण्याची इच्छा अपूरीच राहिली.

Back to top button