खानापूर : चिकमुन्नोळीत मद्यपी पतीचा गळा आवळून खून | पुढारी

खानापूर : चिकमुन्नोळीत मद्यपी पतीचा गळा आवळून खून

खानापूर; पुढारी वृत्तसेवा : चिकमुन्नोळीत मद्यपी पतीच्या जाचाला कंटाळलेल्या पत्नीने त्याचा झोपेच्या गोळ्या देऊन गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी (दि. १) सकाळी उघडकीस आली. बाबू कल्लाप्पा करकी (48, रा. चिकमुन्नोळी ता. खानापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून याप्रकरणी त्याची पत्नी महादेवी बाबू करकी (36) हिला नंदगड पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयासमोर तिला हजर केले असता तिची कारागृहात रवानगी करण्यात आली.

बाबुला दारूचे व्यसन होते. तो दारूसाठी सतत पैशाची मागणी करत पत्नी व मुलांना मारहाण करत होता. दारूसाठी शेतजमीन विकण्याचा त्याचा इरादा होता. दारूच्या आहारी गेलेला पती व्यसनापोटी सर्व जमीन विकून मुलांना काहीच शिल्लक ठेवणार नाही. या चिंतेने महादेवीने सोमवार (दि. 30) रात्री जेवणातून नवऱ्याला झोपेच्या गोळ्या दिल्या. तो गाढ झोपेत असताना दोरखंडाच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर अतिमद्यपान केल्याने पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचा बनाव रचला. तथापि मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना गळ्याजवळ दोरखंडाचे व्रण दिसून आल्याने संशय निर्माण झाला. अधिक चौकशीअंती तिने स्वतःच पतीचा खून केल्याचे कबूल केले. पोलीस निरीक्षक एस. सी. पाटील यांनी 24 तासात संशयित आरोपीला गजाआड केले.

Back to top button