रमेश कत्ती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? | पुढारी

रमेश कत्ती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

चिकोडी; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील राजकारणात आणखी एक महत्त्वपूर्ण घडामोड घडण्याची शक्यता आहे. भाजप नेते माजी खासदार डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा असून चिकोडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा रणधुमाळीनंतर भाजप आणि काँग्रेस आता आगामी लोकसभेच्या तयारीला लागले असून, जिल्ह्यात ११ आमदार असलेल्या काँग्रेसने लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपकडून हिसकावून घेण्याची रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने चिकोडी भागातील प्रभावशाली नेते रमेश कत्ती यांना पक्षाकडे आकर्षित करून त्यांना चिकोडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्याचा विचार सुरू आहे.

चिकोडी लोकसभा मतदारसंघात ८ विधानसभा मतदारसंघ असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ६ मतदारसंघ जिंकल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे. दोनवेळा लोकसभा निवडणूक लढवलेले प्रकाश हुक्केरी सध्या विधानपरिषद सदस्य असल्याने ते लोकसभा लढण्यास इच्छुक नसल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याशिवाय संपूर्ण मतदारसंघाव प्रभाव असणारे नेतृत्त्व काँग्रेस पक्षात नाही. त्यामुळे यापूर्वी एकदा विजयी झालेले आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून या भागात प्रभाव असलेले रमेश कत्ती यांना आपल्या पक्षात आणण्याची गणिते काँग्रेसकडून आखण्यात येत आहे.

यंदा विधानसभा निवडणुकीवेळी रमेश कत्ती काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना चिकोडी सदलगा विधानसभा मतदार संघातून तिकीट दिले होते. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला सध्या राजकीय निर्वासित असलेले रमेश कत्ती यांनीही काँग्रेसच्या या ऑफरला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.

हुक्केरी-कत्ती कुटुंबात अंतर्गत समेट ?

गेल्या विधानसभा निवडणुकीत रमेश कत्ती यांनी चिकोडी सदलगा मतदार संघातून भाजपचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. मात्र, त्यांनी फारशी मेहनत घेतली नाही. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार गणेश हुक्केरी यांचा दणदणीत विजय झाला. आगामी लोकसभा निवडणुकीत रमेश कत्ती यांना पाठिंबा देण्याबाबत दोन्ही कुटुंबांमध्ये करार झाल्याची चर्चा ऐन निवडणुकीवेळी रंगली होती. त्यामुळे रमेश कत्ती यांच्या काँग्रेस प्रवेशाला प्रकाश हुक्केरीही पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच अथणीचे आमदार लक्ष्मण सवदी, कागवाडचे आमदार राजू कागे यांचाही रमेश कत्ती यांना पाठिंबा असल्याची चर्चा आहे.

Back to top button