बेळगाव, कारवार, बिदरमध्ये मराठी मतदार याद्या | पुढारी

बेळगाव, कारवार, बिदरमध्ये मराठी मतदार याद्या

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा धामधुमीनंतर आता तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकांचे रणांगण सुरू होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून बेळगाव, कारवार आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भागात मराठीतून मतदार याद्या देण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे, म. ए. समितीच्या मागणीला यश आले आहे.

राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. 26) तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदान केंद्राची स्थापना आणि मतदार यादी तयार करण्याचे आदेश प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना बजावले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी 5 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली आहे. हाच डेटा वापरुनच तालुका आणि जिल्हा पंचायत मतदारसंघाची यादी तयार करण्याची सूचना आहे.

मराठीतून मतदार यादी मिळावी, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती दरवेळी तहसीलदार आणि जिल्हाधिकार्‍यांना भेटत असते. पण, यावेळी पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने स्वत:हून बेळगाव, कारवार आणि बिदर जिल्ह्यातील मराठीबहुल भागात मराठीतून मतदार यादी उपलब्ध करुन देण्याचे आदेश बजावले आहेत. त्यामुळे, म. ए. समितीच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तालुका आणि जिल्हा पंचायत मतदारसंघ पुनर्रचनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या सीमा निर्णय आयोगाच्या अधिसूचनेनुसार मतदार यादी तयार केली जाणार आहे.

Back to top button