बेळगाव : 9 मे रोजी परंपरेनुसार शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणूक | पुढारी

बेळगाव : 9 मे रोजी परंपरेनुसार शिवजयंतीनिमित्त चित्ररथ मिरवणूक

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : बेळगावमध्ये अक्षय तृतीयेच्या एक दिवशी वैशाख द्वितीयेला पद्धतीने छत्रपती शिवरायांची जयंती साजरी केली जाते. तसेच तिसऱ्या दिवशी भव्यदिव्य चित्ररथ मिरवणूक काढली जाते. यावर्षीही (दि.९) रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. तर (दि.११) रोजी बेळगाव शहरातून भव्य चित्ररथ मिरवणूक काढण्याचे आयोजण केले आहे. शिवप्रेमी आणि विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी चित्ररथ मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात करावी, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील आठवड्यात जत्तीमठ येथे झालेल्या बैठकीतील ठरावाप्रमाणे (दि.०९) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून विविध गडकिल्ल्यावरून आणण्यात येणाऱ्या शिवज्योतीचे स्वागत धर्मवीर संभाजी चौक येथे करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ठीक ९ वाजता नरगुंदकर भावे चौकातील मंडपात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन- आरती करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून वंदन करण्यात येणार आहे.

या बरोबरच (दि.११) रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते पालखीचे पूजन करून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून यावर्षी १०५वी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांना सर्व शिवभक्त आणि नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक दळवी, कार्यवाह मदन बामणे, कार्यवाह विजय पाटील तसेच जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी आणि शिवराज पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा

Back to top button