बेळगाव : महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या | पुढारी

बेळगाव : महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी (दि. 6) मांडण्यात येणार आहे. स्थायी समिती निवड रखडली असली, तरी महापौरांच्या उपस्थितीत विशेष बैठकीत अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले होते.

अर्थसंकल्पाबाबत दोन दिवसांपूर्वी महापौर, उपमहापौरांनी लेखा विभागाशी चर्चा केली होती. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. आता लोकनियुक्त सभागृह 6 फेब्रुवारीला अस्तित्वात आले. त्यामुळे स्थायी समित्यांची निवड झाल्यानंतरच अर्थ स्थायी समिती अध्यक्षांकडून अर्थसंकल्प मांडण्यात येणार होता; पण महापौर, उपमहापौर निवडणूक होऊन महिना होत आला तरी अद्याप स्थायी समिती निवडणुकीच्या हालचाली दिसत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौर्‍यानंतर या निवडणुका होतील, असे सांगण्यात येत होते. पण, अद्याप काहीही हालचाली नाहीत. त्यामुळे सोमवारी महापौर शोभा सोमनाचे यांच्याच उपस्थितीत अर्थसंकल्पाची बैठक होणार आहे. अर्थसंकल्प तयार असून सोमवारी तो सादर करण्यात येणार आहे.

महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प सुमारे 500 कोटींचा असण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता महापालिका सभागृहात अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्यासा़ठी शनिवारी सभागृहाची स्वच्छता करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासन विभागाने दिली.

Back to top button