बेळगाव : सीमाप्रश्नी नव्या ऊर्मीने लढू | पुढारी

बेळगाव : सीमाप्रश्नी नव्या ऊर्मीने लढू

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : ‘हुतात्मा अमर रहे’ आणि ‘बेळगाव आमच्या हक्काचे’ अशा घोषणा देत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना मंगळवारी बेळगाव, कंग्राळी, खानापूर, निपाणीत अभिवादन करण्यात आले. सीमाप्रश्नी नव्या ऊर्मीने लढा देत राहू आणि हुतात्म्यांचे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, असा निर्धार हुतात्मा दिनी करण्यात आला.

17 जानेवारी 1956 च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना मंगळवारी बेळगावातील हुतात्मा चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अभिवादन करण्यात आले. मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तातच हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली, अनसुरकर गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, किर्लोस्कर रोड ते हुतात्मा चौकपर्यंत फेरी काढण्यात आली. अनसुरकर गल्ली आणि किर्लोस्कर रोडवरही हुतात्म्यांना अधिवादन करण्यात आले. फेरीची सांगता सभेने झाली. सभेत बोलताना मध्यवर्ती म. ए. समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मराठी मुलूख मुंबई प्रांतात होता. त्यावेळी कर्नाटकाचे नामोनिशाणही नव्हते. सध्याचे कर्नाटक मुंबई, हैदराबाद आणि इतर प्रांतात विभागलेले होते. म्हैसूर संस्थानाच्या अधिपत्याखालील कर्नाटक 1973 ला जन्माला आले आहे. बेळगाववर दावा करणार्‍या कानडी राज्यकर्त्यांनी आपला इतिहास तपासून पहावा. देशाच्या नकाशात कर्नाटक कोठे होते, याचा एक तरी पुरावा दाखवावा. सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठी अव्याहतपणे लढा देत आहे. पण, मराठी माणसांवर अत्याचार करून त्यांचे मनोबल कमी करण्याचे कारस्थान सातत्याने होत आहे. अशा प्रकारांना मराठी माणूस घाबरणार नाही, तर प्रश्न धसास लागेपर्यंत सीमावासीयांचा लढा सुरूच राहणार, असा इशाराही अष्टेकर यांनी दिला.

आमचे मन बलशाली सीमालढा मोडीत काढण्यासाठी कर्नाटक सरकार हरेक तर्‍हेने प्रयत्न करत आहे. पण, आमचे मनोबल कदापि कमी होणार नाही. ते बलशाली आहे. हुतात्म्यांच्या त्यागातून नवी प्रेरणा घेत लढा सुरूच राहणार आहे. भाई एन. डी. पाटील यांनी सीमालढ्यात संपूर्ण हयात घालवली आणि हुतात्मा दिनीच त्यांनी देह सोडला. त्यांच्या त्यागातून आणि मराठी माणसांच्या ताकदीवर हा लढा सुरू आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेणे, हीच आमची आदरांजली ठरणार आहे, असे मनोगत मध्यवर्ती समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले.

मदन बामणे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मध्यवर्ती समितीचे प्रकाश मरगाळे, रणजीत चव्हाण-पाटील, माजी महापौर सरिता पाटील, किरण सायनाक, नगरसेवक रवी साळुंंखे, शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, माजी नगरसेवक राकेश पलंगे, पंढरी परब, विजय भोसले, दिनेश राऊळ, संभाजी चव्हाण, बाळासाहेब काकतकर, नेताजी जाधव, अ‍ॅड. धनराज गवळी, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, दिगंबर राऊळ, एपीएमसी माजी सदस्य महेश जुवेकर, दत्ता उघाडे, बी. ओ. येतोजी, विकास कलघटगी, शिवप्रतिष्ठानचे किरण गावडे, शिवानी पाटील, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, श्रीकांत कदम, अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे, गणेश दड्डीकर, चंद्रकांत कोंडुसकर, राष्ट्रवादीचे अमोल देसाई, अमित देसाई, अ‍ॅड. महेश बिर्जे, रामा शिंदोळकर, अ‍ॅड. शंकर पाटील, अजित कोकणे, श्रीकांत मांडेकर, सागर मुतगेकर, सागर पाटील आदी उपस्थित होते.

गळचेपीची केंद्र सरकार दखल घेणार का?

अभिवादन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी तज्ज्ञ समिती अध्यक्ष, खासदार धैर्यशील माने यांच्या दौर्‍याबाबत माहिती दिली. खासदार धैर्यशील माने हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावला येणार होते. सुरुवातीला पोलिसांनीही मान्यता दिली होती. पण, जिल्हाधिकार्‍यांनी रातोरात जिल्हाबंदीचा आदेश काढला आहे. देशात कोणालाही कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. असे असतानाही महाराष्ट्राच्या खासदारांना जिल्हाबंदी करून प्रशासनाने आणि कर्नाटकाने घटनात्मक अधिकारांची गळचेपी केली आहे. त्याची केंद्र सरकार दखल घेणार का, असा सवाल करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.

Back to top button