बेळगाव : 2500 माध्यमिक शिक्षकांच्या भरतीसाठी फेब्रुवारीत अधिसूचना | पुढारी

बेळगाव : 2500 माध्यमिक शिक्षकांच्या भरतीसाठी फेब्रुवारीत अधिसूचना

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात रिक्त असणार्‍या 2500 माध्यमिक शिक्षकांच्या जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फेब्रुवारीमध्ये याबाबत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, नव्या कायद्यानुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी लागू केलेल्या आरक्षणाच्या आधारे शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. यामध्ये क्रीडा शिक्षकांचाही समावेश असणार आहे.

कर्नाटकात अजून नवे शिक्षण धोरण (एनईपी) जारी झालेले नाही. राज्यातील 300 ते 400 निवडक शाळांमध्ये 26 जानेवारीपासून नवे शिक्षण धोरण जारी केले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. नवे शिक्षण धोरण पूर्णपणे अभ्यासक्रमावर आधारित नाही. याचा बहुतेक भाग कार्यानुभवावर आधारित आहे. त्यानुसार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री नागेश यांनी सांगितले.

15 हजार शिक्षकांच्या नेमणूक प्रक्रियेचा विषय उच्च न्यायालयात आहे. न्ययालयाच्या आदेशानुसार नेमणुका करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. याबाबत 18 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीवेळी न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे नागेश यांनी सांगितले.

Back to top button