बेळगाव : ‘अग्निवीर भरती’ साठी पहिल्या दिवशी 2 हजार युवक | पुढारी

बेळगाव : ‘अग्निवीर भरती’ साठी पहिल्या दिवशी 2 हजार युवक

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  अग्निवीर अंतर्गत सैन्यभरतीला बेळगावात प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी क्रीडापटूंना संधी देण्यात आली असून 2000 युवकांनी भरतीसाठी सोमवारी पहाटे हजेरी लावली. मंगळवारी इतर क्षेत्रातील युवकांना संधी देण्यात आल्याने सहा राज्यांतील युवक भरतीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सैन्य भरतीच्या ठिकाणी मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे.

येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सोमवारी सकाळी क्रीडापटूंनी भरतीसाठी गर्दी केली होती. सहा पहाटे सहाच्या आत आलेल्या युवकांना भरतीसाठी प्राधान्य देण्यात आले. बाहेरगावाहून आलेल्या युवकांची गैरसोय होऊ नये, म्हणून भरती परिसरात अल्पोपाहाराची व्यवस्था मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे करण्यात आली होती.

सहा राज्यातून युवक भरतीसाठी मंगळवारी बेळगावात दाखल होणार असून हजारो युवक गर्दी करण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती मराठा लाईट इन्फंट्रीतून देण्यात आली. पावसापासून संरक्षणासाठी ठिकठिकाणी तंबू उभारण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे.

तसेच शौचालयाची व्यवस्था केल्याने परराज्यातून आलेल्या उमेदवारांनी समाधान व्यक्त केले. आठवडाभर चालणार भरती प्रक्रिया कोरोनानंतर बेळगावात सर्वात मोठी अग्निवीर अंतर्गत भरती होत आहे. या भरतीसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश, गुजरात आणि छत्तीसगड राज्यातील युवकांना प्राधान्य देण्यात आले आहे. दि. 20, 21 सप्टेंबर रोजी जनरल ड्युटी पदासाठी फक्त महाराष्ट्रातील युवकांना प्राधान्य असणार आहे. ही भरती प्रक्रिया आठवडाभर बेळगावात चालणार आहे.

Back to top button