बेळगाव : ऐन पावसाळ्यात उडाली पाण्यासाठी त्रेधातिरपीट | पुढारी

बेळगाव : ऐन पावसाळ्यात उडाली पाण्यासाठी त्रेधातिरपीट

कोगनोळी; पुढारी वृत्तसेवा : नजीकच बारमाही दूधगंगा नदी वाहत असतानाही ऐन पावसाळ्यात कोगनोळीकरांना पाच-सहा दिवस पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे पावसाळ्यात नागरिकांवर पाणी समस्या ओढवल्याच्या संतापजनक प्रतिक्रिया ऐकावयास मिळाल्या.

विविध वार्डांमध्ये दूधगंगा नदीहून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली आहे. सध्या दूधगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे विद्युत मोटारी सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे पाण्याचा दैनंदिन क्रम बदलला. सोनार आड येथून नियमित पाणीपुरवठा करणार्‍या विद्युत मोटारीचे कनेक्शन तुटल्याने पाच-सहा दिवसांपासून नागरिकांना पाणी समस्येला समस्यांना तोंड द्यावे लागले.

वॉर्ड क्र. 2 व 3 मध्ये पिण्याच्या पाण्याची अडचण झाली. नागरिकांवर टँकरद्वारे पाणी मागवण्याची वेळ आली. पाणीपुरवठ्यातील ढिसाळ नियोजनामुळे पाणीसमस्या निर्माण झाली. याबाबत ग्राम पंचायतीशी संपर्क साधला असता आम्हाला याची कल्पना नसल्याचे अजब उत्तर ऐकावयास मिळाले. ऐन पावसाळ्यात पाणी समस्येला तोंड द्यावे लागल्याने पिण्याच्या पाण्यासाठी आणलेला टँकरही गटारीमध्ये अडकला होता. यावेळी पाणी मिळविण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

गायकवाड गल्ली येथील सरकारी कुपनलिका दुरुस्त करण्यासाठी वायरमनला बोलावून आणले. त्यावेळी व्हॉल्व दुरुस्त करून विद्युत वाहिनी तुटल्याने हेस्कॉमच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आले. यावेळीही उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. वार्ड क्र. 3 मधील पाणीसमस्या कायमस्वरूपी निवारणासाठी प्रयत्न केले जातील, असे ग्रा. पं. सदस्य कृष्णात भोजे यांनी सांगितले.

पाणी समस्येवर बुधवारी तोडगा
वॉर्ड क्र. 3 मध्ये निर्माण झालेली पाण्याची समस्या लक्षात घेऊन माजी जि. पं. उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ग्रा. पं. अध्यक्षा छाया पाटील, सदस्य कृष्णात भोजे, तात्या कागले यांच्या पुढाकारातून ग्राम पंचायतीने पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी दिवटे कोपरा याठिकाणी असलेल्या कूपनलिकेला कनेक्शनची जोडणी करण्यात आली. पाच-सहा दिवस नदी उशाला आणि कोरड घशाला, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली होती.

एका टँकरला 400 रुपये
कोगनोळी येथील वॉर्ड क्र. 3 मधील एका रहिवाशाने घरी कार्यक्रम असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मागविला. टँकरद्वारे पाणी मागविल्यास एका टँकरला सुमारे 400 रुपये द्यावे लागले. त्यामुळे कायमस्वरूपी पाणी समस्येचे निवारण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button