निपाणी : व्यवसायाच्या उभारीसाठी दुचाकी चोरी | पुढारी

निपाणी : व्यवसायाच्या उभारीसाठी दुचाकी चोरी

निपाणी;  मधुकर पाटील :  येथील ग्रामीण पोलिसांनी रविवारी चोरून विक्री करण्यात आलेल्या 25 लाखांच्या 41 दुचाकी जप्त केल्या आहेत. आता दुचाकी मालकांसह खरेदी-विक्री करणार्‍या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. अटक केलेल्या संशयित चौघांनी लॉकडाऊन काळात बुडालेल्या व्यवसायाला उभारी देण्यासह चैनी व कुटुंबाच्या सुखासाठी दुचाकी चोरी केल्या आहेत.

स्वस्तात दुचाकी मिळत असल्याने नागरिकांनी खरेदी केल्या आहेत. 60 ते 70 हजार रुपयांची दुचाकी अज्ञात व्यक्तीकडून 10 ते 15 हजार रुपयांमध्ये मिळत असल्यावर खरेदी करणार्‍यांनी वेळीच विचार करणे गरजेचे होते. रविवारी निपाणी ग्रामीण पोलिसांनी अशा 41 दुचाकी पकडल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊन काळात ट्रक व वडापवरील चालक व्यवसाय करणारे केवळ झटपट श्रीमंती व कुटुंबाच्या सुखासाठी कुर्ली येथील युवराज पोवार, विनायक कवाळे तर हदनाळ येथील सख्खे भाऊ दयानंद शेटके व तानाजी शेटके यांनी पर्याय म्हणून दिवसभर लाकूड वखारीत काम करण्याचे सोंग घेऊन रात्रभर दुचाकींची चोरी केली. पण अखेर त्यांना कारागृहाची हवा खावी लागली. त्यांनी चोरलेल्या दुचाकी आपल्या मित्रासह नातेवाईकांना निम्म्या किंमतीत विकल्या आहेत.

शहरासह ग्रामीण भागात वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या दुचाकी सहज चोरून चोरटे सुटे भाग करून विक्री करतात. त्यातून चोरट्यांना म्हणावा तितका पैसा मिळत नाही. सध्या ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय वाढला असून चारा आणण्यापर्यंत दुचाकीचा वापर होऊ लागला आहे. त्यासाठी स्वस्तातील दुचाकीच्या शोधात शेतकरी असतात. याचा फायदा उठवत चोरीची वाहने मोठ्याप्रमाणात विक्री करण्यात आल्याचे दिसून आले आहे.

चोरट्यांनी दुचाकीची कागदपत्रे न देता 50 ते 60 हजार रुपयांची वाहने केवळ 15 ते 20 हजार रुपयांच्या किंमतीत दिल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिक व शेतकरी स्वस्तात दुचाकी मिळत असल्याने घाईगडबडीने खरेदी करतात; पण आता हे सर्वजण अडचणीत आले आहेत.

दुचाकी चोरट्यांची जेलमध्ये रवानगी

दुचाकी चोरीप्रकरणी अटक केलेल्या चार संशयित चोरट्यांची निपाणी न्यायालयाने हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली आहे. युवराज पोवार, विनायक कवाळे, दयानंद शेटके, तानाजी शेटके अशी त्यांची नावे आहेत.पोलिसांनी 41 दुचाकी जप्‍त केल्याने संबंधित दुचाकी मालक खातरजमा करण्यासाठी पोलिस ठाण्याला भेट देत आहेत. 41 दुचाकी पैकी 34 मूळ मालकांची खातरजमा झाली असून इतर दुचाकी मालकांचा शोध पोलिसांनी जारी ठेवला आहे. मूळ मालक पोलिस ठाण्याला भेट देत असल्यामुळे आवाराला जत्रेचे स्वरूप आले होते. मूळ मालकांना न्यायालयाच्या परवानगीने दुचाकी परत मिळणार असल्याने त्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी दिली.

30 जुलै रोजी रात्री आपण आप्पाचीवाडी फाटा ते कर्नाटक हद्द म्हाकवे क्रॉसपर्यंतच्या मार्गावर गस्त घालत असताना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार युवराज व त्याचा मित्र दयानंद हे दोघेजण आप्पाचीवाडी घुमट मंदिराकडून म्हाकवेच्या दिशेने दुचाकी ढकलत जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी आपले वाहन न दिसणार्‍या ठिकाणी थांबविले. आपण पादचार्‍याचे सोंग घेऊन युवराज व दयानंदला हा रस्ता कोठे जातो, अशी विचारणा केली. त्यावेळी आलेल्या संशयावरून दोघांनाही ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला.
-अनिलकुमार, उपनिरीक्षक, ग्रामीण पोलिस ठाणे, निपाणी

Back to top button