निपाणी : तहसीलदारांच्या नावाने पैसे घेणार्‍यास दणका | पुढारी

निपाणी : तहसीलदारांच्या नावाने पैसे घेणार्‍यास दणका

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : नावात बदल करून देण्याच्या कामाच्या बदल्यात तहसीलदारांचे नाव सांगून 10 हजार रुपये उकळणार्‍या ठकसेनाला शनिवारी निपाणी तहसीलदारांनी फैलावर घेऊन खडसावात तत्काळ रक्कम परत केली.

याबाबत अधिक माहिती अशी, मूळचे तवंदी या व सध्या निपाणीत वास्तव्यास असणार्‍या एका महिलेचा पती सैन्यदलात आहे. या महिलेच्या नावात बदल करण्यासाठी तहसीलदारांची सही आवश्यक होती. यासाठी सदर दाम्पत्य तहसीलदार कार्यालयात आले होते. यावेळी तेथे आलेल्या एका ठकसेनाने सदर दाम्पत्याला तहसीलदार हे आपले खास ओळखीचे असून तत्काळ सही घेऊन आपले काम करून देतो, असे सांगत 10 हजार रुपये घेतले.

याबाबत तहसीलदार डॉ. मोहन भस्मे यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने सदर दाम्पत्यास बोलावून घेतले. पैसे का दिले यावरून सदर दाम्पत्याची तहसीलदारांनी कानउघडणी केली. यानंतर सदर ठकसेनविरोधात तत्काळ पोलिस स्थानकास कळवून कारवाईचा पवित्रा घेतला. याची कुणकुण लागताच सदर व्यक्तीने तत्काळ तहसीलदार व संबंधित दाम्पत्याशी संपर्क साधत माफी मागितली. तसेच घेतलेले 10 हजार रुपयेही त्याने सदर दाम्पत्यास परत केले.

आपल्या नावाचा गैरवापर करून फसवणार्‍या व्यक्तीने माफी मागितली आहे. तहसीलदार कार्यालय हे तालुका प्रशासनाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे येथे कोणत्याही एजंटगिरीला थारा दिलेला नाही. कोणीही कोणत्याही कामासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत. तसेच कोणी पैसे मागितल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा.
– डॉ. मोहन भस्मे, तहसीलदार, निपाणी

Back to top button