मातृभाषेवर प्रेम करा; तरच सिनेसृष्टीची ऊर्जितावस्था फळा | पुढारी

मातृभाषेवर प्रेम करा; तरच सिनेसृष्टीची ऊर्जितावस्था फळा

बेळगाव : ज्ञानेश्‍वर पाटील काळ कितीही बदलला तरी भारतीय सिनेसृृष्टी कधीच थांबणार नाही. चित्रपटगृहे देखील कधीच बंद पडणार नाहीत. कोरोना काळात दोन वर्षे सिनेसृष्टी थांबली, मात्र मागे गेली नाही. हे थांबणेसुध्दा वाईट असल्यानेे लोकांच्या सवयीवर परिणाम झाला. प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यासाठी सिनेजगत धडपडत आहे. पण, सिनेसृष्टीला ऊर्जितावस्था देण्यासाठी मातृभाषेवर प्रेम करा, असे मत ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी व्यक्‍त केले.

बेळगावात नर्तकी चित्रपटगृहात सदिच्छा भेटप्रसंगी दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 17 वर्षांपूर्वी बेळगावात ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाच्या शुभारंभप्रसंगी आपण आल्याची आठवणही त्यांनी जागवली.

प्रश्‍न : कोरोनानंतर सिनेमा आणि प्रेक्षक यांच्यात दुरावा निर्माण झालाय का?
पूर्वी सिनेमा पाहायला चालत जाणारी माणसे चित्रपटावरच चर्चा करत असत. हा संवाद, ही देवाणघेवाण चित्रपटापेक्षा मोठी असते. प्रेक्षक दोन तास बसून सिनेमा बघतो, तेवढ्यापुरता तो सिनेमा मर्यादित नसतो. थिएटरमध्ये सिनेमा लागला की बघायला जाण्याची सवय कमी झाली आहे. दोन वर्षांत अन्य क्षेत्राप्रमाणे सिनेसृष्टीवरही दुष्परिणाम झाला. चित्रपटसृष्टी आहे, त्याठिकाणी थांबली. त्याचा परिणाम अजूनही दिसत आहे. सिनेसृष्टी यात पुन्हा भरारी घेईल, यात शंका नाही.

प्रश्‍न : नवीन तंत्रज्ञान आणि गतिमान जीवनशैलीला चित्रपटसृष्टी कसे तोंड देत आहे?
पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे. सध्या एका सिनेमागृहात चार चित्रपट एकाचवेळी लावले जातात. पण, ते चार दिवसही चालत नाहीत. पूर्वी एका सिनेमाचे चार शो एकाच सिनेमागृहात होत आणि तो सिनेमा 25 आठवडे चालायचा. आता काळ बदलला आहे. फास्टफूडचा जमाना असल्याने लोकांना सगळ्याच गोष्टी फास्ट पाहिजे. पूर्वी तिकीट काढून सिनेमा बघताना तो मध्येच बंद पडला तर आम्हाला अर्धाच सिनेमा दाखवला असे म्हटले जायचे. आज दोन तासांवर चित्रपट बघवत नाही. डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे सिनेसृष्टीचा फायदाच झाला आहे.

प्रश्‍न : बायोपिक चित्रपटांचा सध्या सुकाळ आहे. हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर गल्‍ला जमवत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत असे वाटते का?
आजघडीला बायोपिकच चालतो, असे नाही. ‘भुलभुल्‍लैया’ बायोपिक नसतानाही चालला. एक बायोपिक चालला म्हणून दुसरा चालेलच याची शाश्‍वती नाही. एखादा चित्रपट बायोपिकचा जमाना आहे, म्हणून तो मी बनवणार नाही. विनोदी चित्रपट बनवायचे मनात आले तर मी तोच चित्रपट करेन. लोकांना कधी काय आवडेल ते सांगता येत नाही. प्रयत्न करणे आपल्या हातात आहे.

प्रश्‍न : आगामी काळात आपणास कोणती भूमिका करण्यास आवडेल?
अभिनय प्रांतात प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या भूमिकांचे आकर्षण असते. संधी आली तर मला स्वामी विवेकानंद यांची भूमिका साकारायची आहे. बायोपिकची लाट आलेय म्हणून मला ते करावेसे वाटत नाही. तर विवेकानंद हे मोठे व्यक्‍तिमत्त्व असल्याने त्या भूमिकेचे आकर्षण आहे.

प्रश्‍न : बदलत्या काळात मराठी रंगभूमीचे भवितव्य काय असणार आहे?
रंगमंचावर सजीव सादरीकरण होत असल्याने रंगभूमीचे महत्त्व कधीच कमी होणार नाही. अभिनय, संगीत, नृत्य समोरासमोर पाहताना वेगळा आनंद असतो. लोकसंख्या वाढत असताना रंगभूमीवरील प्रेक्षकांची संख्याही वाढत आहे.

प्रश्‍न : काळ बदलला, करमणुकीची साधनेही बदलली, सध्या मनोरंजनाकडे युवा पिढी कशी पाहते?
सध्या मनोरंजनाची अनेक साधने घरबसल्या उपलब्ध आहेत.इंटरनेटमुळे आपल्या आयुष्यात अनेक बदल झाले. ओटीटीवर तुम्ही नवीन प्रदशिर्ंत चित्रपट, वेब सीरिज हवे तेव्हा पाहू शकता. येत्या काळात आपल्या देशात ओटीटी सर्व्हिसला मागणी वाढणार आहे. काळ जसा पुढे धावेल, तशी मनोरंजनातही क्रांती होत आहे.

प्रश्‍न : प्रेक्षकांचा चांगल्या चित्रपटाकडे पाहण्याचा द‍ृष्टिकोन कसा असतो? गेल्या 60 वर्षातील आपला अनुभव काय?
माझ्या 60 वर्षांच्या वाटचालीत वयाला अनुरूप भूमिका केल्या. मात्र चित्रपट पाहताना मी सामान्य रसिक असतो. चांगला सिनेमा पाहायचा म्हणून लोक चित्रपटगृहाकडे जातात. हसावे वाटले तर पोट धरून हसतात आणि डोळ्यात पाणी आले तर त्याची त्यांना लाज वाटत नाही. सिनेमा पाहून झाल्यानंतरही त्याचे पडसाद प्रेक्षकांच्या मनावर उमटत असतात, हे त्या चित्रपटाचे यश असते.

हेही वाचा

Back to top button