आरटीई प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ हजारांवर अर्ज.. | पुढारी

आरटीई प्रवेशासाठी पहिल्याच दिवशी 'इतक्या' हजारांवर अर्ज..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षण विभागातर्फे सुधारित आरटीई प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू करण्यात आली असून, पहिल्याच दिवशी तब्बल 21 हजार 135 पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक सुमारे 4 हजार 585 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. आरटीई ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस असला, तरी पालक मोठ्या संख्येने अर्ज भरत असल्याचे दिसून येत आहे.

शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश अर्ज भरण्यासाठी येत्या 31 मेपर्यंत मुदत दिली आहे. शिक्षण विभागाच्या https:///student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून आरटीई प्रवेशाचा अर्ज भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली आहे. राज्यातील 9 हजार 136 इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील 1 लाख 2 हजार 428 जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर शाळांची संख्या, उपलब्ध जागा आणि अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या देण्यात आली आहे. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळी साडेसातपर्यंत 21 हजार 135 विद्यार्थ्यांचे अर्ज जमा झाले होते. पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असल्याने या वर्षीसुद्धा सुमारे तीन ते चार लाख पालक आरटीई प्रवेशासाठी अर्ज करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा

Back to top button