बेळगाव : ‘त्या’ अर्भकांमध्ये सहा पुरुष जातीचे | पुढारी

बेळगाव : ‘त्या’ अर्भकांमध्ये सहा पुरुष जातीचे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुडलगी (ता. गोकाक) येथील ओढ्याजवळ सापडलेल्या सात अर्भकंचा फॉरेन्सिक अहवाल प्राप्त झाला असून, यामध्ये सहा पुरुष जातीचे तर एक गर्भकोष असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रथमदर्शनी यामध्ये भ्रूण हत्या आढळली नसून, कर्मचार्‍याने कामकाजात हलगर्जीपणा दाखवल्याने हा प्रकार घडला आहे.

या प्रकरणी पुढील सूचना येईपर्यंत मुडलगी येथील व्यंकटेश प्रसूतीगृहाला सील ठोकण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी ‘पुढारी’ला दिली. मुडलगी येथील नाल्यामध्ये शुक्रवारी सात अर्भक आढळून आली होती. याप्रकरणाची आरोग्य विभागाने गांभीर्याने दखल घेतली असून सातही अर्भक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोग शाळेत (फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरी) पाठवण्यात आली होते. त्याचा अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाला. त्यानुसार यात सहा भ्रूण हे पुरुष जातीचे असून, एक गर्भकोष आहे. हॉस्पिटलच्या कर्मचार्‍याने या अर्भकांची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्याने हा प्रकार घडून आला आहे. हे हॉस्पिटल तपास पूर्ण होईपर्यंत सील केले आहे, अशी माहिती कोणी यांनी दिली.

प्रथम दर्शनी ही भ्रूण हत्या वाटत नसली तरी याच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. अर्भकांची विल्हेवाट योग्य प्रकारे लावण्यात आलेली नाही. याचा अहवाल ठेवण्यात आला नाही. याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– नितेश पाटील, जिल्हाधिकारी,

मुडलगीत दोन प्रसूतीगृहे, रुग्णालयांना टाळे

गोकाक; पुढारी वृत्तसेवा : मुडलगी बसस्टँडनजीकच्या ओढ्यामध्ये प्लास्टिक बरण्यांध्ये 7 मृत अर्भक सापडल्यानंतर शनिवारी मुडलगी पोलिस व आरोग्य विभागाच्या पथकाने छापे टाकून मुडलगीतील दोन प्रसूतीगृहे आणि रुग्णालयांना टाळे ठोकले असून एकूण 6 केंद्रावर छापा टाकल्याचे समजते.

शुक्रवारी मुडलगीतील ओढ्यामध्ये 7 मृत अर्भके सापडली होती. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी तत्काळ मुडलगीस भेट देऊन आरोग्य विभाग व पोलिसांना तपास कार्याचे आदेश दिले होते. सीपीआय श्रीशैल ब्याकुड व उपनिरीक्षक हालप्पा बालदंडी यांच्या नेतृत्त्वाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने तपासमी सुरू करताना मुडलगीत 6 स्कॅनिंग सेंटरवर छापा टाकून माहिती घेतली. तसेच वेंकटेश मॅटर्निटी होम व नवजीवन हॉस्पिटलची तपासणी करून टाळे ठोकण्यात आले आहेत. त्यामुळे मुडलगी व गोकाक तालुक्यातील प्रसुतीगृहे आणि हॉस्पिटल चालकांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हाधिकार्‍यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये तपास करण्याचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत.

Back to top button