बीजिंग : एखादा तारा मृत झाला की त्याचे रूपांतर प्रचंड आकर्षण शक्ती असलेल्या पोकळीत म्हणजेच कृष्णविवरामध्ये होत असते. या कृष्णविवराच्या तावडीतून प्रकाशाचा किरणही सुटू शकत नाही. मात्र, अशा पोकळ्या पृथ्वीच्या जवळच निर्माण होतील, याची आपण कल्पनाही करू शकणार नाही. दहा वर्षांपूर्वी क्वालालंपूरहून बीजिंगला निघालेलं मलेशिअन एअरलाईन्सचं 'एमएच370' विमान अचानक बेपत्ता झालं होतं. हे विमान बेपत्ता कसं झालं, याचा अजूनही शोध लागू शकलेला नाही. या विमानामध्ये 239 प्रवासी होते. आजवर ना या विमानाचे अवशेष सापडलेत, ना विमानातील प्रवाशांचे किंवा वैमानिक आणि इतर हवाई कर्मचार्यांचे मृतदेहही सापडले नाहीत. ते मलेशिया आणि व्हीएतनामदरम्यान असलेल्या एका 'कृष्णविवरा'त गडप झाले असावे, असेही म्हटले जात आहे!
गेली चार वर्ष माजी हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापक जीन ल्युक मार्चंड आणि निवृत्त वैमानिक पॅट्रीक ब्लेली यांनी हे विमान बेपत्ता कसं झालं आणि ते कुठे गेलं याचा शोध लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. या दोघांनी बोईंग 777 च्या प्रतिरूपाचा म्हणजेच सिम्युलेटरचा वापर करून बेपत्ता विमानाच्या माहिती असलेल्या शेवटच्या हवाई मार्गाची पद्धती आणि विमानाचे नियंत्रण करणार्या ज्या कोणी व्यक्ती होत्या त्यांच्या मानसिकतेचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. यातून त्यांना दिसून आलं, की हे विमान मलाक्का सामुद्रधुनीपर्यंत पोहोचल्यानंतर रडारवरून दिसेनासं झालं होतं. बीबीसीने 'व्हाय प्लेन्स व्हॅनिश : द हंट फॉर एमएच370' नावाचा माहितीपट तयार केला आहे.
यामध्ये माजी हवाई वाहतूक नियंत्रण व्यवस्थापक जीन ल्युक मार्चंड आणि निवृत्त वैमानिक पॅट्रीक ब्लेली यांनी सांगितले, की हे विमान आता बेपत्ता झाले असून, त्याचा कधीही शोध लागू शकत नाही. या दोघांनी म्हटले ही ज्याने कोणी हे केलं आहे तो अतिशय हुशार माणूस असावा. जिथे हे विमान बेपत्ता झाले तो भाग क्वालालंपूर आणि व्हिएतनाममधील कृष्णविवरासारखा आहे. या विमानातून आपण संकटात असल्याचा किंवा मदत हवी असल्याचा संदेश मिळाला नव्हता. आश्चर्याची बाब ही आहे की या विमानाचा निर्धारित मार्ग बंद करण्यात आला होता आणि हे विमान त्यानंतर 7 तास उडत होतं. या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क मानवी पद्धतीने बंद करण्यात आला होता. यामुळे विमानातील कर्मचार्यांना वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येत नव्हता. मग अचानक हे विमान बेपत्ता झालं आणि या बेपत्ता झालेल्या विमानाने जगभर खळबळ उडवून दिली.
8 मार्च 2014 रोजी हे विमान बीजिंगच्या दिशेने झेपावले होते. सर्व काही व्यवस्थित चालले होते. विमानाने उड्डाण करून 38 मिनिटे उलटून गेली होती. यानंतर कॅप्टनचे हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी शेवटचे बोलणे झाले. त्यांचे शेवटचे शब्द होते, गुड नाईट मलेशियन 370. यानंतर त्यांनी व्हिएतनामी एअर स्पेस कंट्रोलरशी संपर्क साधणे अपेक्षित होते. मात्र, अचानक हे विमान बेपत्ता झाले. हे विमान शोधण्यासाठी 4 वर्ष प्रयत्न करण्यात आले. 1500 कोटी रुपयांहून अधिकचा खर्च झाला, तरीही हे विमान सापडले नाही. 1,20,000 स्क्वेअर मीटरचा परिसर खंगाळण्यात आला, मात्र या विमानाचा एकही अवशेष सापडला नाही. यामुळे या विमानाचे काय झाले, याचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.