महाड : पंधरा विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना कोरोनाची लागण | पुढारी

महाड : पंधरा विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना कोरोनाची लागण

विन्हेरे (महाड), पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील एका शाळेतील पंधरा विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती महाडचे गटविकास अधिकारी पोळ यांनी दिली .

शाळेतील एक विद्यार्थ्याचा  कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर विद्यार्थी व शिक्षकांची अँटिजीन तपासणी करण्‍यात आली. दरम्यान, गेल्या ४८ तासांत जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संख्येमुळे रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व खासगी शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्‍यात येईल, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

पंचायत समितीच्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने विन्हेरे केंद्रातील जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक माध्यमिक तसेच खासगी शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

मागील चार दिवसांत महाड तालुक्यात सतरा कोरोना बाधित रूग्णांची माहिती ग्रामीण रुग्णालयाकडून घोषित करण्यात आली होती. या सर्वांच्या चाचण्या केल्यानंतर त्यांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बावडेकर यांनी दिली आहे.

महाड शहरातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे सांगण्यात येत असून, नागरिकांनी आवश्यक असलेल्या सर्व खबरदारी घ्यावी, असे आवाहन नगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button