

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : हिवाळी अधिवेशनानंतर आठवड्याभरातच राज्यातील तब्बल 13 मंत्री आणि 70 आमदारांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे बुधवारी होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आली आहे. (ministers corona positive)
मागील आठवड्यात हिवाळी अधिवेशन पार पडले. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मंत्री आणि आमदार बाधित झाले. याशिवाय अनेक आजी-माजी खासदार, नेत्यांना संसर्ग झालेला आहे. हिवाळी अधिवेशनात हे सर्व मंत्री, आमदार एकत्रच होते. त्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क आलेला होता. सध्या लग्नसराईचा काळ असल्याने अनेक मंत्री, आमदार लग्नसमारंभाला हजेरी लावत आहेत.
मंत्रिमंडळातल्या 13 सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्याने मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आल्याचे मंत्र्यांच्या खासगी सचिवांना मंगळवारी दुपारी निरोप देण्यात आले.
मंत्रिमंडळ बैठकीदिवशी बहुतांश आमदार आपापल्या मतदारसंघांतील कामे घेऊन मंत्र्यांना भेटण्यासाठी मंत्रालयात येत असतात.
बर्याच नेते, लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त करत मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुण्यात पहिली ते आठवीच्या शाळा 30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नववीपासून पुढील वर्ग सुरू राहणार आहेत.
पुणे जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संसर्गाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी एका बैठकीत घेतला. या बैठकीत पुण्यात काही निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आदी उपस्थित होते.
दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना मॉल, शासकीय कार्यालये, हॉटेल्स, बार-रेस्टॉरंटस्मध्ये प्रवेश बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय विनामास्क आढळणार्यांना 500 रुपये दंड, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1 हजार रुपये दंड केला जाणार आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सक्रिय रुग्णसंख्या 171 वर गेली. यापैकी 54 रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. उर्वरित 117 रुग्णांवर घरीच (होम आयसोलेशन) उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात सध्या 10 हजार 994 खाटांची (बेड) उपलब्धता आहे. या एकूण उपलब्ध खाटांपैकी जिल्ह्यात सध्या केवळ 0.49 टक्के इतकेच खाट रुग्णांनी व्यापले आहेत.