औंढा नागनाथ: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोळेगाव परिसरातील पूर्णा मुख्य कालव्यात हातपाय धुण्यासाठी गेलेला तरुण बुडाल्याची घटना सोमवारी (दि.२९) घडली होती. आज (दि.३०) सकाळी १० च्या सुमारास अंजनवाडी परिसरात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. अमन जमील कुरेशी (वय १९, रा. गोळेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील तरुण अमन कुरेशी संध्याकाळी घरी न आल्यामुळे त्याला फोन वर संपर्क केला असता तो फोन उचलत नसल्याने घरच्यांना शंका आली. त्या बाबत संध्याकाळी औंढा नागनाथ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करून शोध घेण्याची विनंती करण्यात आली होती.
रात्री शोध घेत असताना ८ च्यादरम्यान गावाजवळून वाहणाऱ्या कालव्याच्या काठावर तरुणाचा मोबाईल व कपडे आढळून आले. यावरून तरुण कालव्यात बुडाल्याची शंका गडद झाली. रात्री उशिरा पर्यंत स्थानिक तरुणांनी जवळा बाजार पर्यंत कालव्यात तरुणाचा शोध घेतला. परंतु पाण्याचा प्रवाह व अंधारामुळे यश आले नाही. मंगळवारी सकाळी पुन्हा शोध घेत असताना अंजनवाडी शिवारात युवकाचा मृतदेह आढळून आला. अमनला पोहता येत नव्हते, त्यामुळे कालव्याच्या काठावर बसून तो हातपाय धुत असताना पाय घसरून पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा