कोल्हापूर : मानसिंग बोंद्रेचा अंदाधुंद गोळीबार; शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून अंबाई टँक परिसरातील प्रकार | पुढारी

कोल्हापूर : मानसिंग बोंद्रेचा अंदाधुंद गोळीबार; शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून अंबाई टँक परिसरातील प्रकार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून मानसिंग विजय बोंद्रे (रा. अंबाई टँक कॉलनी, फुलेवाडी) यांनी राहत्या घराच्या कंपाऊंडजवळ अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना सोमवारी रात्री उघड झाली. याप्रकरणी मानसिंग बोंद्रे यांच्या विरोध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे.

मानसिंग बोंद्रे यांचे चुलत सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (वय 33, रा. अंबाई टँक कॉलनी, शालिनी पॅलेस जवळ कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. अंबाई टँक परिसरात अंदाधुंद गोळीबार झाल्याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद कांबळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा मध्यरात्री दाखल झाला होता.

चौकशीअंती मानसिंग बोंद्रे यांनी गोळीबार केल्याचे निष्पन्न झाल्याने आणि गोळीबार करतानाची चित्रफित सोशल मीडियावर तत्काळ व्हायरल झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी नारे यांनी सांगितले. अभिषेक बोंद्रे आणि संशयित मानसिंग बोंद्रे नात्याने चुलत सावत्र भाऊ आहेत.

दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि संस्थेच्या शेत जमिनी आणि इतर मालमत्तांच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरू आहेत. या वादातून मानसिंग बोंद्रे यांनी, ‘अभिषेक बोंद्रे यांना आणि तुझ्या खानदानला संपवितो तुझा गेम करतो’ अशी धमकीही संशयितांनी दिल्याचे अभिषेक बोंद्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

आपणाला जीवे मारण्याच्या उद्देशानेच मानसिंग बोंद्रे यांनी स्वतःजवळ असलेल्या रिव्हॉल्वरमधून अंदाधुंद गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. असेही त्यात म्हटले आहे या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयित मानसिंग बोंद्रे यांचा शोध घेण्यात येत आहे लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : थकलेल्या वृद्ध एसटी कर्मचाऱ्यांची आर्त हाक ! | ST Workers senior citizens story

Back to top button