Virat vs Rohit : विराट कोहली-रोहित शर्मामध्ये पटेना, टीम इंडियातील ‘मतभेद’ विकोपाला! | पुढारी

Virat vs Rohit : विराट कोहली-रोहित शर्मामध्ये पटेना, टीम इंडियातील ‘मतभेद’ विकोपाला!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-२० विश्वचषकातील दारूण पराभवानंतर टीम इंडियामध्ये धुसफुस सुरू आहे, तिथं सर्व काही सामान्य नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. नुकत्याच घडलेल्या काही घडामोडींनंतर क्रिकेट चाहत्यांनाही तसेच वाटत आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली असून, आता पुढे कसे होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (virat vs rohit)

विराट कोहलीने टी-२० संघाचे संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे सांगितले. त्यानंतर ‘बीसीसीआय’ने टी-२० संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची निवड केली. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेत त्याने विजय मिळवून स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी पहिले पाऊल टाकले. त्यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका १-० ने कोहलीच्या नेतृत्वाखाली जिंकली. हे सर्व पाहून क्रिकेट चाहते सुखावले. आता द. आफ्रिका दौ-यात टीम इंडिया चांगले प्रदर्शन करणार अशी स्वप्ने चाहते पाहू लागले; पण अचानक बीसीसीआयने द. आफ्रिकेच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर दोन नव्या घोषणा केल्या. एक कसोटीसाठी १८ जणांचा संघ आणि दुसरी वनडे संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची निवड. यातील दुस-या घोषणेनंतर भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली. विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याने त्याचे चाहते भडकले तर अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी भुवया उंचावल्या. रोहित शर्माकडे टी २० आणि वनडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आल्यानंतर काही दिवसातच बीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी निवड समितीची पाठ थोपटली आणि रोहित नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. (virat vs rohit)

T20 विश्वचषकातील पराभवानंतर… (virat vs rohit)

T20 विश्वचषक स्पर्धेनंतर विराट आणि रोहित दोन दिग्गज खेळाडू टीम इंडियासाठी एकत्र खेळले नाहीत. आता विराटही दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेतून माघार घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. त्याआधी काल (दि. १३) रोहित शर्माबद्दल मोठी बातमी समोर आली. दक्षिण आफ्रिका दौ-यापूर्वी मुंबईत सराव शिबिर सुरू होते. यात रोहित जायबंदी झाला. दुखापत गंभीर असल्याने द. आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेतून तो बाहेर पडला. बीसीसीआयने काल संध्याकाळीच याबाबत ट्विट केले. आणि त्याच्या जागी प्रियांक पांचाळला संघात संधी दिल्याचे जाहीर करण्यात आले.

न्यूझीलंडविरुद्ध मालिका…

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या T20 मालिकेत विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली. त्या मालिकेत रोहित शर्माने संघाचे नेतृत्व करत जोरदार यश मिळवले. त्यानंतर किवी संघाविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. कसोटी संघात रोहित नव्हता. रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली होती. तर विराट फक्त मुंबई कसोटी खेळला. कानपूर कसोटी सामन्यात तो सहभागी झाला नाही. त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणेने संघाचे नेतृत्व केले. म्हणजे न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० आणि कसोटी मालिकेत विराट आणि रोहित (virat vs rohit) दोघे पुन्हा एकत्र क्रिकेट खेळलेच नाहीत.

एकदिवसीय कर्णधारपद गेले…

आतापर्यंत सर्व काही ठीक होते; पण विराट कोहलीला न कळवता वनडेच्या कर्णधारपदावरून हटवण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला. यानंतर वादळ उठले. विराटची वनडे संघाच्या कर्णधार पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे, हे समजताच क्रिकेट वर्तृळात खळबळ माजली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नंतर एका मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले की, ‘आम्ही विराटला टी-२० चे कर्णधारपद न सोडण्याची विनंती केली होती, पण विराटने ते मान्य केले नाही. वनडे आणि टी २० संघांसाठी दोन वेगळे कर्णधार नसावेत, अशी निवड समिती आणि बीसीसीआयची इच्छा होती. त्यामुळेच विराटला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढण्यात आले आणि त्याच्या जागी रोहित शर्माकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले.’

दक्षिण आफ्रिकेतही आशा नाही…

खरतरं विराट आणि रोहित हे दोन खेळाडू कोणत्याही संघात एकत्र खेळले तर संघ खूप मजबूत दिसतो; पण आता दोघांमध्ये धुसपुस सुरू असल्याने ते एकत्र खेळणे कठीण होऊ लागल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार द. आफ्रिका दौ-यामध्येही विराट आणि रोहित पुन्हा एकत्र खेळताना आपल्याला दिसण्याची शक्यता कमीच आहे. कारण विराट हा दक्षिण आफ्रिका दौ-यातील कसोटी संघाचा कर्णधार असून रोहित दुखापत झाल्याने तो या मालिकेत बाहेर पडला आहे. तो वनडे मालिकेपर्यंत बरा होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. पण रोहित शर्मा वनडे संघाचा कर्णधार असल्याने विराट कोहलीने या मालिकेतून आपले नाव मागे घेतल्याचे समोर येत आहे. यावरून हे दोन दिग्गज खेळाडू पुन्हा एकत्रित मैदानावर खेळणार नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

विराटची वैयक्तिक कारणांमुळे माघार…

विराट कोहली द. आफ्रिकेतील वनडे मालिकेतून माघार घेणार असल्याचे समजते आहे. यामागे वैयक्तीक कारण असल्याचे सांगण्यात आले आहे. विराटला त्याच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा असल्याने तो संघाचा भाग नसेल असे सांगितले जात आहे. मात्र, विराट कोहली वनडे मालिकेत आफ्रिका दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयने अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही. तसेच वनडे मालिकेसाठी मंडळाने संघाचीही घोषणा अद्याप केलेली नाही. या दौऱ्यात भारतीय संघाला तीन कसोटी आणि तीन वनडे सामने खेळायचे आहेत. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे.

Back to top button