MPSC Exams : औषध निरीक्षक पदाच्या ८७ जागांसाठीची भरती प्रक्रिया स्थगित | पुढारी

MPSC Exams : औषध निरीक्षक पदाच्या ८७ जागांसाठीची भरती प्रक्रिया स्थगित

पुढारी ऑनलाईन डेस्क

MPSC Exams : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, गट-ब पदाच्या ८७ जागांसाठीची भरती प्रक्रिया स्थगित केली आहे. याबाबतचे पत्रक लोकसेवा आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

शासनाच्या मागणीपत्रानुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १७ नोव्हेंबर रोजी औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, गट ब पदाच्या ८७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ६ डिसेंबर रोजीच्या शासन पत्रान्वये शासनाकडून प्राप्त सूचनानुसार आयोगामार्फत १७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली विषयांकित संवर्गाची जाहिरात व भरतीबाबतची पुढील कार्यवाबी तूर्त स्थगित करण्यात येत आहे, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने नुकतेच २०२१ आणि  २०२२ मधील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जानेवारीमध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Exams) सन २०२२ मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यसेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा , महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा , महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा , महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा होणार आहेत.

राज्यसेवा २०२१ ची परीक्षा २ जानेवारी, २०२२ रोजी पूर्व तर ७, ८ व ९ मे रोजी मुख्य परीक्षा होणार असून या पूर्व परीक्षेचा निकाल मार्चमध्ये तर मुख्य परीक्षेचा निकाल ऑगस्ट २०२२ मध्ये लागणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा १२ मार्च रोजी तर निकाल मे, २०२२ मध्ये, मुख्य परीक्षा २ जुलै, २०२२ तर निकाल ऑगस्ट २०२२ मध्ये लागणार आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व २०२१ ही परीक्षा २६ फेब्रुवारी रोजी तर निकाल एप्रिल २०२२ मध्ये लागेल.
महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा २०२१ संयुक्त पेपर ९ जुलै, पोलिस उपनिरीक्षक पेपर क्रमांक २ १७ जुलै, पेपर क्रमाक २ राज्य कर निरीक्षक २४ जुलै, पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी ३१ जुलै रोजी होणार आहे. या परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२२ मध्ये लागेल.
महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ ची पूर्व परीक्षा ३ एप्रिल रोजी तर निकाल मे २०२२ रोजी लागणार आहे.

हे ही वाचा :

Back to top button