MPSC Exam : राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर! | पुढारी

MPSC Exam : राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर!

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर राज्यसेवा पूर्व परीक्षा – 2021 व मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या 2 जानेवारी, 2022 रोजी पूर्व परीक्षा तर मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी होणार आहे. जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजपासून विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून एमपीएससीची एकही जाहीरात प्रसिद्ध झाली नव्हती. मात्र, अखेर 2021 ची मेगा भरती होणार आहे. कोरोना महामारीमुळे या परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आयोगामार्फत आता 290 पदांसाठी 17 संवर्गात भरती केली जाणार आहे. तसेच, याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच या परीक्षासंदर्भात आयोगाने ट्विटद्वारे देखील माहिती दिली आहे. येत्या 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा राज्यभरातील 37 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा होणार असल्याचे म्हटले आहे. पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी किंवा त्यानंतर आयोजित होणार आहे.

5 ऑक्टोबरपासून दुपारी दोन वाजेपासून अर्ज करता येणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर असणार आहे. सर्व भरतीप्रक्रियांकरीता सर्वसाधारण गुणवत्त यादी आयोगाच्या संकेतस्थळार प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसेच, बहूसंवर्गीय पदांच्या भरती प्रक्रियांकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्वसाधारण गुणवत्ता यादीच्या आधारे पात्र उमेदवारांकडून पसंतीक्रम मागवून त्याच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

उपजजिल्हाधिकारी 12, पोलीस उपअधीक्षक 16, सहकार राज्य कर आयुक्त 16 , गटविकास अधिकारी 15, सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-अ 15, उद्योग उप संचालक 4, सहायक कामगार आयुक्त 22, उपशिक्षणाधिकारी 25, कक्ष अधिकारी 39, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी 4, सहायक गटविकास अधिकारी 17, सहायक निबंधक सहकारी संस्था 18, उपअधीक्षक भूमि अभिलेख 15 , उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्कर 1, उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क 1,सहकारी कामगार अधिकारी 54 पदांसाठी राज्य सेवा परीक्षा होतील.

अधिक वाचा :

Back to top button