धुळे : एसटीसमोर आंदोलन करणाऱ्या आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याच्या पत्नीसह १४ जणांविरोधात गुन्हा | पुढारी

धुळे : एसटीसमोर आंदोलन करणाऱ्या आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याच्या पत्नीसह १४ जणांविरोधात गुन्हा

धुळे, पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. गेल्या दोन दिवसांपासून एसटी प्रशासनाने हा संप मोडीत काढण्यासाठी पावले उचलली आहे.

याअंतर्गत साक्री बसस्थानकातून निजामपुरकडे जात असलेल्या (एमएच 20 बीएल 436) या बससमोर आंदोलन करणाऱ्या आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीसह इतर कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बस चालक शशिकांत जीरे हे साक्री बसस्थानकातून गाडी बाहेर काढत असताना आत्महत्याग्रस्त एसटी कर्मचाऱ्याची पत्नी योगिता कमलाकर बेडसे यांनी या बस समोर आंदोलन सुरु केले. शासनाने एसटी कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूती दाखवून, विलिनीकरणाची मागणी मान्य करावी तसेच या संपात सर्व कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी केले.

त्यानंतर अर्चना शरद खैरनार, माया संजय मोरे ,मनीषा अनिल गावित, अनिता जितेंद्र ढोमसे ,मनीषा भास्कर कळकोटे, किरण निंबा पाटील ,पुष्पलता भटूराव पवार, सोनाली अनिल जगताप, स्वप्नील शिवदास साळुंके, अतुल राजाराम साळुंके ,जयवंत सुभाष भामरे, सुनील मधुकर भामरे यांनी चालकाला ही बस बाहेर घेऊन जाऊ नये म्हणून आवाहन केले.

त्यामुळे घडलेल्या प्रकाराची एसटी महामंडळाने गंभीर दखल घेत, साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार वरील सर्व तेरा जणांविरोधात भादवि कलम 341, 143, 186, 147, 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीमध्ये आंदोलन करणाऱ्या कर्मचारी आणि महिलांनी चालकाला बांगड्या आणि फुलहार दाखवून महामंडळाच्या कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button