नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशाच्या लष्करी इतिहासाला हादरवणारी घटना काल तमिळनाडूमधील कुन्नूरमध्ये घडली. देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह ११ जणांचा हेलिकॉप्टर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. हा केवळ अपघात नसून देशाच्या लष्करी सामर्थ्याला बसलेला हादराच आहे अशीच प्रतिक्रिया उमटली.
सीडीएस बिपीन रावत यांच्या स्टाफमधील ब्रिगेडिअर सुखबिंदर सिंग लिडेर यांचाही यामध्ये मृत्यू झाला. पंचकुला येथील मूळ असलेले सुखबिंदर सिंग लिडेर दुसऱ्या पीढीचे लष्करी अधिकारी होते. ते गेल्या एक वर्षांपासून जनरल बिपीन रावत यांच्या स्टाफमध्ये कार्यरत होते. त्यांनी जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या द्वितीय बटालियनचे नेतृत्व केले.
ब्रिगेडियर लिडेर यांना मेजर जनरल पदोन्नतीसाठी मान्यता देण्यात आली होती आणि त्यांनी लवकरच जनरल रावत यांच्या स्टाफमधून एका डिव्हिजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून काम केले असते. याबाबत इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने वृत्त दिले आहे.
निवृत्त ब्रिगेडियर चिरंजीव असलेल्या सुखबिंदर सिंग लिडेर यांनी तिबेटला लागून असलेल्या हिमाचल सीमेवरी ब्रिगेडचे नेतृत्व केले आहे. त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण अकादमीमधून कोर्स केला होता. ते सातत्याने लष्करी बाबींवर लिहीत होते. त्यांनी 'China's counter space capabilities' या विषयावर त्यांनी सेंटर फॉर लँड वॉरफेअर स्टडीजसाठी लेख लिहिला होता.
त्यांचे मित्र त्यांना आवडीने टोनी म्हणत असत. त्यांनी गीतिका यांच्याशी विवाह केला. त्या शिक्षण क्षेत्राशी निगडीत आहेत. २८ नोव्हेंबरला त्यांनी त्यांच्या १६ वर्षीय मुलीने लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले होते. त्यांची मुलगी आता १२ वी मध्ये शिकत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मधुलिका रावत आणि पाँडिचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
रावत यांच्या स्टाफमध्ये आणखी एक अधिकारी म्हणजे लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग हे सुद्धा ११ गोरखा रायफल्समधील. याच रायफल्समधून बिपीन रावत यांनी आपल्या लष्करी कारर्किदीचा प्रारंभ केला. त्यांनी त्यांच्या बटालियनसह सियाचीनमध्ये लढा दिला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मिशनमध्येही सहभाग घेतला. ते मुळचे लखनौमधील, पण नंतर ते दिल्लीत स्थायिक झाले.
या दोन अधिकाऱ्यांसह स्पेशल फोर्समधील पाच प्रिन्सिपल स्टाफ ऑफिसर आणि ११ गोरखा रायफल्समधील हवालदार यांचाही या अपघातात मृत्यू झाला. लान्स नायक गुरुसेवक सिंग हे गेल्या तीन वर्षांपासून रावत यांच्यासोबत होते त्यांचाही या घटनेत मृत्यू झाला. ते पंजाबमधील आहेत.
हे ही वाचलं का ?