Tomato Price : देशभरात टोमॅटो दराचा भडका, प्रति किलो १२० रुपयांवर! | पुढारी

Tomato Price : देशभरात टोमॅटो दराचा भडका, प्रति किलो १२० रुपयांवर!

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशभरात टोमॅटो दराचा (Tomato Price) भडका उडालाय. विशेषतः दक्षिण भारतात टोमॅटो दराने उच्चांक गाठलाय. मुसळधार पावसाने टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे पुरवठा कमी झाल्याने दर भडकले आहेत. देशातील काही भागांत टोमॅटोचा दर प्रति किलो १२० रुपयांवर गेला आहे. यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

केरळमधील तिरुवनंतपूरम येथील बाजारात टोमॅटो १२० रुपये किलो प्रमाणे विकला जात आहे. तसेच बंगळूर येथे टोमॅटोच्या किमतीत प्रति किलोमागे ७० रुपयांची वाढ झाली आहे. पावसामुळे टोमॅटोसह फूलकोबी, कोंथिबीर, भेंडी, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे हा भाजीपाला कमी प्रमाणात बाजारात येत आहे. तामिळनाडूतील चेन्नईत टोमॅटो प्रति किलो ९० रुपयांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्रातील काही भागांत टोमॅटो १०० रुपये प्रति किलो विकला जात आहे. पावसामुळे टोमॅटो पीक खराब झाले असून त्याची वाहतूक करतानादेखील त्याचे नुकसान होत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचे दर (Tomato Price) कोसळले होते. यामुळे महाराष्ट्रातील सांगली तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर ओतला होता. ऑगस्टमध्ये टोमॅटोला प्रति किलो दोन ते तीन रुपये इतका अत्यल्प दर मिळाला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.

देशात दक्षिणेकडील राज्यातून सर्वाधिक टोमॅटोचा पुरवठा केला जातो. पंरतु, दक्षिण भारतात झालेल्या अतिवृष्टीमुळे टोमॅटोच्या पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. लग्नसराईमुळे टोमॅटोच्या मागणीतदेखील वाढ झाल्याने दर कडाडल्याचे बोलले जात आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका सर्वासामान्यांना बसत आहे. देशात बहुतांश प्रमाणात दक्षिणेतून टोमॅटोचा पुरवठा होत असल्याने शेतमालाची आवक कमी झाल्याने दर कडाडले आहेत. देशातील बड्या शहरांमध्ये टोमॅटोचे दर १०० रूपयांवर पोहोचले आहेत.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती?

Back to top button