वर्षभर पिकवा टोमॅटो, लागवड कशी करावी? | पुढारी

वर्षभर पिकवा टोमॅटो, लागवड कशी करावी?

कोणत्याही हंगामात होऊ शकणारे पीक म्हणून टोमॅटो ओळखला जातो. दैनंदिन आहारात टोमॅटोला नेहमीच पसंती दिली जाते. त्यामुळे टोमॅटोला नेहमीच चांगली मागणी असते. हलक्या, मध्यम आणि भारी अशा कोणत्याही प्रकारच्या जमिनीत हे पीक घेता येते. मात्र, या पिकाची लागवड करताना शेतकर्‍याला बरीच काळजी घ्यावी लागते. अगदी पाणी देण्यापासून तोडणी करण्यापर्यंत अनेक बाबतीत ही काळजी घ्यावी लागते.
महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. महाराष्ट्रात दरवर्षी या पिकाखाली 35 ते 40 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. या पिकापासून दरवर्षी 68 हजार टन उत्पादन मिळते. महाराष्ट्रातील या पिकाची सरासरी उत्पादकता 28.2 मेट्रिक टन आहे. टोमॅटो पिकास उष्ण हवामान चांगले मानवते. या पिकाची लागवड करताना पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. मध्यम काळी किंवा पोयट्याच्या जमिनीत हे पीक चांगले येते. जमीन हलकी असेल तर पीक लवकर निघते. भारी जमिनीत फळाचा तोडा उशिरा सुरू होतो. परंतु, उत्पादन भरपूर निघते. टोमॅटो लागवड ज्या जमिनीत करायची त्या जमिनीत अगोदरच्या हंगामात वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत.
टोमॅटोच्या झाडांची मुळे खोलवर जात असतात. त्यासाठी जमिनीची खोलवर नांगरट करून घ्यावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीपूर्वी चांगले कुजलेले शेणखत 20 ते 25 मेट्रिक टन प्रतीहेक्टरी जमिनीत मिसळून घ्यावे. नंतर 90 सें.मी. अंतरावर सरी पाडून घ्यावे. जमिनीचा उतार लक्षात घेऊन पाणी व्यवस्थित बसण्यासाठी योग्य आकारमानाचे सरी वाफे तयार करून घ्यावेत. लागवडीकरिता जोमदार आणि निरोगी रोपे तयार करणे हाच यशस्वी लागवडीचा आणि भरघोस उत्पादन मिळविण्याचा पाया आहे.
रोपवाटिकेसाठी 3 मीटर लांब, 1 मीटर रूंद आणि 15 ते 20 सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करून घ्यावेत. प्रत्येक वाफ्यावर एक घमेले चांगले कुजलेले शेणखत, 100 ग्रॅम सिंगल सुपरफॉस्फेट, 50 ग्रॅम लिंडेन पावडर, 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड पावडर मिसळून घ्यावी.
यानंतर गादीवाफ्यावर 10 सें.मी. अंतरावर रुंदीला समांतर 1 सें.मी. खोलीच्या रेषा पाडून घ्याव्यात. टोमॅटो बियाण्याची पातळ पेरणी करून बियाणे हलकेसे मातीने झाकून घ्यावे. बियाणे उगवून येईपर्यंत सकाळी आणि संध्याकाळी झारीने आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. रोप उगवून आल्यानंतर पाट पाणी द्यावे. टोमॅटो लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत आवश्यक असणारी पूर्वमशागत करून सरीवाफे तयार ठेवावेत. टोमॅटो पिकास वेळेवर व नियमित पाणीपुरवठा करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
त्यामुळे पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच पिकाची लागवड करावी. रब्बी हंगामात 6 ते 8 दिवसांच्या अंतराने व उन्हाळी हंगामात 4 ते 6 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी देण्यास उशीर झाल्यास  फुलगळ होते, फळधारणा कमी होते, फळांचे आकारमान बदलणे, फळे तडकणे इ. प्रकार होतात. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास तणांचे प्रमाण कमी होते. तसेच पाण्याची 30 ते 40 टक्के बचत होते. रोप लागवडीनंतर 15 ते 20 दिवसांनी एक खुरपणी करून झाडांच्या खोडाला मातीची भर द्यावी. टोमॅटो पिकातील तण वरचेवर काढून पीक तणमुक्त ठेवावे. लागवडीनंतर 45 ते 60 दिवसांनी एक खांदणी करून झाडांना भर द्यावी.
भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो या पिकावर मोठ्या प्रमाणावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आढळतो. रोगामध्ये प्रामुख्याने विषाणूजन्य रोग (व्हायरस) अतिशय घातक आहेत. रोग येऊ नये; म्हणून अगोदर काळजी घेणे महत्त्वाचे असते. फुलकिडी, मावा, पांढरी माशी, तुडतुडे आणि नागअळी या रस शोषणार्‍या किडी आहेत. तसेच पांढरी माशी, तुडतुडे यांच्यामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रसार होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी थायोमेथोक्झाम 4.0 ग्रॅम किंवा इमिडॅकलोरोपीड 4.0 मि.लि. किंवा होस्टॅथिऑन 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून फवारणी करावी.
पाने कुरतडणारी अळी, फळे पोखरणारी अळी या किडींमुळे पानांचे आणि फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. फळे पोखरल्यामुळे फळे सडतात आणि अशी फळे विक्री होत नाहीत. या किडींच्या नियंत्रणासाठी अ‍ॅशीफेट 20 ग्रॅम अथवा क्विनॉलफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मर या रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास पेरणीपूर्वी थायरम 3 ग्रॅम अथवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रतिकिलो चोळून पेरणी करावी. लागवडीनंतर प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लि. पाण्यामध्ये मिसळून हे द्रावण रोपांच्या बुंध्याशी ओतावे.   पानावरील करपा हा प्रामुख्याने पावसाळी हंगामात जास्त येतो. त्यासाठी डायथेन एम 45 हे औषध 25 ग्रॅम अथवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारणी करावी.
 भुरी या रोगामध्ये पानांवर पांढरी पावडर पडल्यासारखी दिसते. या रोगाचे प्रमाण हिवाळी हंगामात जास्त असते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारी गंधक पावडर (80 टक्के) 25 ग्रॅम कॅलेक्झिन 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. विषाणू रोग हा टोमॅटोच्या सर्व रोगांमध्ये घातक असा  रोग आहे.  सर्व उपाययोजना करूनही रोग आल्यास सोडियम फॉस्फेट 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास टोमॅटो उत्पादनात वाढ होते.  टोमॅटो रोपे लावल्यानंतर साधारणत: 55 ते 65 दिवसांनी फळांची तोडणी सुरू होते. फळांच्या तोडीची अवस्था फळे कोणत्या बाजारपेठेसाठी पाठवावयाची किंवा प्रक्रिया उद्योगासाठी पाठवावयाची आहेत यावर अवलंबून असते.
फळे लांबच्या बाजारपेठेसाठी पाठवावयाची असतील तर पिवळा ठिपका असलेली फळे तोडावीत. अशी फळे वाहतुकीत खराब होत नाहीत. मध्यम पल्ल्याच्या बाजारपेठेसाठी गुलाबी फळे तोडावीत. जवळच्या बाजारपेठेसाठी आणि प्रक्रिया उद्योगासाठी पूर्ण लाल झालेली फळे तोडावीत. फळांची तोडणी सकाळी अथवा दुपारी तापमान कमी असताना करावी. फळांची तोडणी करण्याअगोदर 4 ते 5 दिवस औषध फवारणी करू नये. फळांची तोडणी केल्यावर फळे सावलीत ठेवावीत. फळांच्या आकारमानानुसार प्रतवारी करावी. कीड आणि रोगग्रस्त फळे बाजूला काढावीत.

 

Back to top button