आपण आजारी पडलो, तर डॉक्टर आपल्या शरीराचे तापमान थर्मामीटरने मोजतात आणि त्यानुसार औषधे लिहून देतात. त्याप्रमाणे जमिनीचे तापमानही मोजले जाते. पेरणी करताना किंवा रोपांची लागवड करण्यापूर्वी जमिनीतील तापमान पाहणे महत्त्वाचे असते. कारण, विविध पिकांची जसे तृणधान्य, कडधान्य, फळझाडे पिकांच्या मुळांची खोली वेगवेगळी असते. मुळांच्या परिसरातील तसेच जमिनीतील विविध खोलीपर्यंतचे तापमान मोजण्यासाठी सॅाईल थर्मामीटर या उपकरणाचा उपयोग केला जातो. हे थर्मामीटर लाकूड किंवा विशिष्ट आवरणात ठेवलेले असते आणि तळाशी बुडालेले स्टेनलेस स्टीलचे टोकदार टोक असते. या थर्मामीटरने 3,6,9 आणि 12 इंच या प्रमाणात जमिनीच्या खोलीचे तापमान मोजता येते. जमिनी खूप थंड आहे का? किंवा खूप उष्ण आहे का? पेरणी करण्यासाठी किंवा रोपे लावण्यासाठी जमिनीचेतापमान किती असले पाहिजे, हे सॉईल थर्मामीटरच्या सहाय्याने तपासता येते.
कारण, जमिनीच्या तापमानाचा जमिनीत होणार्या रासायनिक आणि भौतिक क्रियांवर फार परिणाम होतो. पिकांना बीजांकुरापासून त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत विशिष्ट तापमानाची गरज असते. जमिनीचे तापमान 10 अंश सेंटिग्रेडपेक्षा कमी असेल, तर पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही आणि तर तापमान 50 अंश सेंटिगे्रडपेक्षा जास्त असेल, तर पिकांना इजा पोहोचते. जमिनीतील जीवाणूंच्या क्रियाशीलतेसाठी जमिनीचे विशिष्ट तापमान असणे आवश्यक असते. जसे नत्राच्या स्थिरीकरणासाठी, सेंद्रिय पदार्थांच्या विघटनासाठी जमिनीच्या 27 अंंश सेंटिगे्रड ते 32 अंश सेंटिग्रेड तापमानाची आवश्यकता असते. जमिनीचे तापमान मुख्यत्वेकरून सूर्याकडून मिळणार्या प्रारंभिक ऊर्जेवर अवलंबून असते. त्याचे नियंत्रण आणि समतोल हे जमिनीतील आर्द्रतेवर अवलंबून असतेे. म्हणून शेती करताना, मशागत करताना जमिनीचे तापमान मोजण्याने शेती पद्धतीत निश्चितच आधुनिकता आणता येईल.
हे ही वाचा :