कर्नाटकात ‘ओमायक्रॉन’चा शिरकाव | पुढारी

कर्नाटकात ‘ओमायक्रॉन’चा शिरकाव

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा :  कोरोनाचा रुपांतरित स्ट्रेन असणार्‍या ओमायक्रॉनचे दोन रुग्ण कर्नाटकात आढळले आहेत. देशात प्रथमच ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे संपूर्ण कर्नाटकात हाय अ‍ॅलर्ट जारी करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात 95 जण दक्षिण आफ्रिकेतून बंगळूरला आले होते. त्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी दोघांमध्ये नवा विषाणू सापडला. केंद्रीय आरोग्य खात्याचे सहसचिव लव अगरवाल यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे.

ोन रुग्णांपैकी एकजण गेल्या तीस वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत राहतो. व्यापारानिमित्त त्याची भारत आणि आफ्रिकेत फिरती असते. आणखी एक रुग्ण बंगळूरचा असल्याचे केंद्र सरकारने कळवले आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला रुग्ण बंगळुरातील स्टार हॉटेलमध्ये उतरला होता. तो 211 जणांच्या प्राथमिक आणि दुय्यम संपर्कात आला होता. दोन रुग्णांपैकी एकजण दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. दुसर्‍या रुग्णावर बंगळुरात उपचार केले जात आहेत.

कर्नाटकात खबरदारी ओमायक्रॉनचे दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याने राज्य शासनाने व्यापक खबरदारी घेतल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वत्थनारायण यांनी दिली. येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, रुग्णांची तपासणी करून उपचार केले जात आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी अभ्यास केला जात आहे. हा विषाणू वेगाने पसरतो. प्रयोगशाळेला जिनोम सिक्वेन्स पाठवण्यात आले होते. या विषाणूमुळे गंभीर आजार होत नाही. 11 देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार

बेळगावातील अधिवेशनाबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार

बेळगावात हिवाळी अधिवेशन होणार आहे. पण, कोरोना संसर्ग वाढत असल्याने मंत्रालयातील कर्मचार्‍यांनी बंगळुरातच अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाईल. बेळगावात अधिवेशनाचे आव्हान आणि तेथे अधिवेशन नको असल्याची मागणी अशा दोन्ही विषयांवर चर्चा करून निर्णय घ्यायचा आहे. मुख्यमंत्री बोम्मई, सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री डॉ. अश्वत्थनारायण यांनी सांगितले.

आणखी पाच बाधित?

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. त्यांच्यामुळे आणखी पाचजणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. 46 वर्षीय व्यक्ती आफ्रिकेतून आल्यानंतर तीन दिवस हॉटेलमध्ये क्वॉरंटाईन होती. तीन दिवसांनी चाचणी केल्यानंतर अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांनी बोम्मसंद्र येथे बोर्ड मिटिंगमध्ये भाग घेतला. त्यांच्या प्राथमिक संपर्कात आलेल्यांना धोका आहे. 66 वर्षीय व्यक्तीची ट्रॅव्हल हिस्टरी नाही. पण, त्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचे स्वॅब जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाचवर जाणार आहे.

वय ः 46 (पुरुष)
* 21 नोव्हेंबर ः ताप आणि अंगदुखीची लक्षणे, आरटीपीसीआर चाचणी, पॉझिटिव्ह, नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले.
* 22 नोव्हेंबर ः गृहविलगीकरणात पाठवले.
* 25 नोव्हेंबर ः रुग्णालयात दाखल. उपचार सुरू.
* 27 नोव्हेंबर ः तीन दिवसांच्या उपचारानंतर घरी पाठवले.
प्राथमिक संपर्कात आलेल्या व्यक्ती 13.
दुय्यम संपर्कात आलेल्या व्यक्त 205.

वय ः 66 (पुरुष)
* 20 नोव्हेंबर ः आफ्रिकेतून भारतात दाखल. बंगळूर विमानतळावर तपासणी. त्यानंतर तो उतरलेल्या हॉटेलमध्ये पुन्हा तपासणी. पॉझिटिव्ह. हॉटेलमध्ये विलगीकरण.
* 22 नोव्हेंबर ः नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले.
* 23 नोव्हेंबर ः रुग्णाने करून घेतलेल्या स्वयंचाचणीत अहवाल निगेटिव्ह. संपर्कात आलेले सर्वजण निगेटिव्ह.
* 27 नोव्हेंबर ः जिनोम सिक्वेन्सिंगचा अहवाल येण्याआधीच विमानाने दुबई.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्ली दौर्‍यावर आहेत. शुक्रवारी सकाळी ते बंगळूरला परतणार आहेत. अधिकारी, मंत्र्यांची बैठक घेऊन नवी नियमावली जाहीर केली जाईल. काही खबरदारीचे उपायही सुचवले जातील.
– डॉ. के. सुधाकर
आरोग्यमंत्री

 

Back to top button