आळेफाटा (जि. पुणे); पुढारी वृत्तसेवा: अवकाळी पावसामुळे पुण्यातील जुन्नर पूर्व भागात शेकडो मेंढ्यांसह जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेंढपाळांना याचा फटका बसला आहे.
हातावर पोट असणारे मेंढपाळ आपल्या मेंढ्या चारण्यासाठी वणवण भटकत असतात. दिसेल त्या पडीक क्षेत्रावर संसार थाटायचा आणि मेंढ्यांचा सांभाळ करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करायचा असा त्याचा नित्यक्रम असतो. मात्र, नियतीला त्याचे हे कष्टही मान्य नव्हते की काय, असाच प्रकार जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात घडला आहे. वातावरणात वाढलेल्या गारठ्यामुळे मेंढपाळांच्या तब्बल शेकडो मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. तर त्याची कोकरेही आता अखेरच्या घटका मोजत आहेत.
निसर्गाची अवकृपा बळीराजावर तर यापूर्वीच झाली आहे; पण आता शेती व्यवसायाशी निगडीत असलेल्यांवर देखील याचा परिणाम होत आहे. जुन्नर पूर्व भागातील वडगाव आनंद, आळे, राजुरी, बेल्हे, आणे, साकुरी, बोरी परिसरात विसावा घेतलेल्या मेंढपाळाच्या बाबतीत ही दुर्देवी घटना घडलेली आहे. यामध्ये मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे ही घटना घडली असून आता मेंढपाळातून आर्थिक मदतीची मागणी होत आहे. माजी आमदार शरद सोनावणे यांनी वडगाव आनंद येथे विसावा घेतलेल्या मेंढपाळाला भेट दिली. यावेळी १२० मेंढ्या, १३ शेळ्या, १० कोकरे, १ गाय मेलेल्या अवस्थेत आढळली.
शक्यतो थंडीचा परिणाम हा मेंढ्यावर होत नाही, पण गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात गारठा प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा पंचनामा करण्याचे काम तलाठी करत असून मृत झालेल्या मेंढ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आर्थिक मदत मिळेल, अशी आशा मेंढपाळांना आहे.
हेही वाचलंत का?