Nashik Rain : अवकाळी पावसाने देवळा तालुक्यातील दहिवड येथे १६ जनावरांचा मृत्यू | पुढारी

Nashik Rain : अवकाळी पावसाने देवळा तालुक्यातील दहिवड येथे १६ जनावरांचा मृत्यू

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : देवळा तालुक्यात झालेला अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दहिवड येथे सुमारे तब्बल १६ लहान-मोठी जनावरे मृत्युमुखी पडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळा तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे देवळा तालुक्यातील शेती पिकांबरोबरच मेंढपाळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे शेतकरी पूर्णतः मेटाकुटीला आला असून, काढणीस आलेला लाल कांदा खराब होण्याची शक्यता आहे. तसेच महागड्या उन्हाळी कांद्याच्या रोपावरही दव पडून त्यावर बुरशीजनक रोगाचा प्रादुर्भाव होवून, ते खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.

त्याचबरोबर दहिवड येथील शिदेंवाडी, भंवरी मळा येथील मेंढपाळ कौतिक शिंदे यांच्या ४ मेंढ्या, २ कोकरु, १ बकरी, २ बकरीचे पिल्ले, १ गायीचे वासरू, भवरी मळा येथील दादाजी देवरे यांच्या ६ मेंढ्या रात्रभर पडलेल्या पावसाने पडलेल्या गारठ्यामुळे ही जनावरे मुत्यूमुखी पडली आहेत. या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने त्वरीत पंचनामा करून, संबंधितांना त्वरीत भरपाई मिळावी अशी मागणी, प्रहारचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी केली आहे.

हेही वाचा :

व्हिडिओ पहा : म्हणूनच शाहू महाराजांनी कधीही व्यसन न करण्याचा निर्धार केला | Story of Shahu Maharaj

Back to top button