Balasaheb Lakade : विट्याचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब लकडे यांचे निधन - पुढारी

Balasaheb Lakade : विट्याचे माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब लकडे यांचे निधन

विटा : पुढारी वृत्तसेवा : Balasaheb Lakade : विट्याच्या आर्थिक, उद्योग, सामजिक, शैक्षणिक, राजकीय पटलावर आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नेते अश्विनी कुमार तथा बाळासाहेब रामचंद्र लकडे (७८) यांचे निधन झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष, विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अशा विविध पदावर त्यांनी काम पाहिले.

ज्येष्ठ नेते बाळासाहेब लकडे हे जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक होत. काका या नावाने ते परिचित होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी लकडे उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. अत्यंत कष्टातून त्यांनी लकडे उद्योग समूहाचा विस्तार केला.

Balasaheb Lakade : विविध पदांवर कार्यरत

विटा वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष, शिक्षण सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून त्यांनी पाच वर्षे काम पाहिले. विटा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष म्हणून काम करण्याचा बहुमान त्यांना मिळाला. अनेक सामाजिक संस्था आणि शासनाने आदर्श उद्योजक म्हणून त्यांचा गौरव केला. जिल्हाभरातील नवउद्योजकांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले.

लोकनेते राजारामबापू पाटील यांचे खंदे समर्थक

लोकनेते राजारामबापू पाटील यांचे ते खंदे समर्थक होते. बापूंच्या पश्चात त्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी सलोखा ठेवला. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, आर. आर. पाटील यांच्याशीही त्यांचा विशेष स्नेह होता. आमदार अनिलराव बाबर यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. विट्याच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक प्रगतीत काकांनी बहुमोल योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुकुंद, विक्रम, विशाल अशी तीन मुले, पाच मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Back to top button