Chandrakant Jadhav : उद्योजक, फुटबॉल, तालीम जपणारा जिंदादिल आमदार हरपला | पुढारी

Chandrakant Jadhav : उद्योजक, फुटबॉल, तालीम जपणारा जिंदादिल आमदार हरपला

पुढारी ऑनलाईन डेस्क : Chandrakant Jadhav : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार उद्योजक चंद्रकांत जाधव यांचे आज (दि.०२) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद मधील रुग्णालयात उपचार सुरु होते. आमदार जाधव यांचे विशेष प्रेम फुटबॉलवर होते. फुटबॉल खेळाचा पाठीराखा म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख होती.

उत्तम उद्योजक आणि फुटबॉल खेळाचा पाठीराखा म्हणून आमदार जाधव यांची कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला ओळख होती. कोल्हापूरमध्ये फुटबॉल खेळ टिकवण्यासाठी ते मोठ्या फुटबॉल स्पर्धा भरवायचे.

२०१९ साली आमदार झाल्यावर कोल्हापुरातील उद्योग वाढीसाठी आणि उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. समाजात आमदार म्हणून रुबाब न करता अत्यंत साध्या पद्धतीने सामान्य लोकांमध्ये आण्णा मिसळत असतं. कोल्हापुरात तालीम पेठा असल्याने त्यांनी तालमीच्या पोरांना खेळाच्या बाबतीत नेहमी प्रोत्साहन दिले.

Chandrakant Jadhav : कोल्हापूरच्या उद्योगासाठी आमदार जाधव यांचे योगदान

चंद्रकांत जाधव यांचे जाधव इंडस्ट्रिज, प्रेमला पिक्चर्स, जाधव टूल्स, जाधव बेवरेजेस, जाधव मेटल्स, प्रेमला इंडस्ट्रिज असे उद्योग आहेत. उद्योग क्षेत्रात त्यांनी लौकिक मिळवला होता. कोल्हापूरमध्ये उद्योगवाढीसाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच शाहू जन्मस्थळाच्या सुशोभीकरणासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे.

कोल्हापूर विमानतळ येथील उजळाईवाडी -तामगाव डायव्हर्जन रस्त्यासाठी त्यांना स्वत: हजर राहत काम करून घेतले.

आज गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. दुपारी एक पर्यंत त्यांचे पार्थिव कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. उद्योजक जाधव (Chandrakant Jadhav) यांचा कोल्हापूर शहरातील अनेक तालीम मंडळाशी फुटबॉललच्या माध्यमातून थेट संपर्क होता. त्याबरोबरच राजकीय व सामाजिक कार्यातून त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला होता.

उद्योजक जाधव यांच्या निधनाबद्दल कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्याच निवडणुकीत मोठे यश

2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजय प्राप्त केला होता. पहिल्यांदाच निवडणूक लढवून त्यांनी हे यश मिळवले होते. मागच्या दीड वर्षात त्यांना दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यातून ते ठणठणीत बरे झाले होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. आमदार जाधव यांना पोटात इन्फेक्शन झाले होते. हैदराबाद मधील रुग्णालयात त्यांच्यावर सोमवारी मोठी शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाली, परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती उपचाराला साथ देत नव्हती. त्यातच आमदार चंद्रकांत जाधव यांची निधन झाले.

Back to top button