थंडीने गारठून १५ मेंढ्यांचा मृत्यू; आंबेगावमधील शिंगवेतील घटना | पुढारी

थंडीने गारठून १५ मेंढ्यांचा मृत्यू; आंबेगावमधील शिंगवेतील घटना

पारगाव; पुढारी वृत्तसेवा

अवकाळी पावसात थंडीने गारठून मेंढपाळाच्या १५ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शिंगवे (ता. आंबेगाव) येथील कासार मळ्यात गुरुवारी (दि. २) पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली. तर चार मेंढ्या अंत्यवस्थ आहेत. यामुळे मोहन करगळ या मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिंगवे ते भागडी रस्त्यावर दिगंबर भगवान मेहेत्रे यांच्या शेतामध्ये मोहन म्हस्कू करगळ या धनगर मेंढपाळाचा वाडा मागील आठ दिवसांपासून वास्तव्यास आहे. बुधवारी (दि. १) दिवसभर या परिसरात अवकाळी पाऊस पडला. सायंकाळच्या वेळी मोहन मस्कु करगळ यांनी सर्व मेंढ्या दिगंबर भगवान यांच्या शेतात वाडा करून बांधल्या. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास वाड्यातील १५ मेंढ्या थंडीने गारठून मृत्युमुखी पडल्या. तर चार मेंढ्या सध्या अंत्यवस्थ आहेत.

यानंतर मोहन करगळ यांनी घटनेची खबर माऊली पोखरकर यांना दिली. पोखरकर यांनी शिंगवे गावचे पोलीस पाटील गणेश पंडित यांना माहिती कळवली. या घटनेमुळे मोहन करगळ धनगर मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.

हेही वाचा:

व्हिडिओ पहा : Travel Vlog | वीकेंडला फिरता येईल असं कोल्हापूरपासून जवळच ठिकाण

Back to top button