गुरूच्या चंद्रावर शोधले थंड होणार्‍या लाव्हाचे सरोवर | पुढारी

गुरूच्या चंद्रावर शोधले थंड होणार्‍या लाव्हाचे सरोवर

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी गुरूच्या ‘आयओ’ या चंद्रावर थंड होत असलेल्या लाव्हाचे सरोवर शोधले आहे. त्याचे एक नवे अ‍ॅनिमेशनही आता समोर आले आहे. ‘नासा’च्या जुनो अंतराळयानाने ‘आयओ’च्या ज्वालामुखींनी भरलेल्या पृष्ठभागापासून 1,500 किलोमीटर अंतरावरून हे छायाचित्र टिपले आहे. डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 या काळात हे छायाचित्र टिपण्यात आले.

आपल्या ग्रहमालिकेतील सर्वात मोठा ग्रह असलेल्या गुरूला 90 पेक्षा अधिक चंद्र आहेत. त्यापैकी ‘आयओ’ हा त्याच्या अंतर्गत भागातील एक मोठा चंद्र आहे. त्याच्या शेकडो सक्रिय ज्वालामुखी आहेत. ‘नासा’ने म्हटले आहे की, ‘आयओ’वरील ज्वालामुखींचे उद्रेक कधी कधी इतके मोठे असतात की, ते पृथ्वीवरूनही टेलिस्कोपच्या साहाय्याने पाहता येतात.

आता या नव्या प्रतिमेत ‘लोकी पॅटेरा’ नावाच्या लाव्हा सरोवराला पाहता येते. हे सरोवर 200 किलोमीटर लांबीचे आहे. अनेक दशकांपासून खगोलशास्त्रज्ञ या सरोवराचे निरीक्षण करीत आहेत. या सरोवराच्या मध्यभागी असलेला लाव्हा थंड होत असून, कडेला वितळलेला मॅग्मा आहे. एखाद्या थंड होत असलेल्या काचेइतका मऊ व नितळ असा पृष्ठभाग या प्रतिमेमधून पाहायला मिळतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

Back to top button