Health Insurance : बदल आरोग्य विम्यातील | पुढारी

Health Insurance : बदल आरोग्य विम्यातील

स्वाती देसाई

विमा कंपन्या आता मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा यासारख्या आजारांची माहिती न दिल्याच्या आधारावर केलेला दावा नाकारू शकणार नाही. सलग पाच वर्षे विमा हप्ता भरल्यानंतर कोणताही दावा नाकारला जाणार नाही. यानुसार आरोग्य विम्यात (Health Insurance) व्यापक बदल करण्यात आले आहेत.

विमा नियामक संस्था इर्डाने विमाधारकांचे हित लक्षात घेता आरोग्य विमा (Health Insurance) योजनेत बरेच बदल केले. इर्डाने विमा दाव्यासाठीचा ‘मोरेटियम पीरियड’ कमी केला. त्याचवेळी प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजेच अगोदरपासूनच असलेल्या आजाराला विमा कवच देण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधीदेखील कमी केला. तसेच पॉलिसी खरेदी करण्यासाठी कमाल वयाची मर्यादादेखील काढून घेतली आहे. या बदलामुळे पॉलिसीधारकांना फायदाच होणार आहे.

मोरेटोरियम पिरियड कमी

विम्याच्या (Health Insurance) दाव्यासाठी मोरेटोरियम पीरियड 8 वर्षांवरून पाच वर्षे केला आहे. आता सलग 60 महिन्यांपर्यंत कवच दिल्यानंतर विमा कंपनी ग्राहकाचा कोणताही क्लेम ‘नॉन डिसक्लोजर’ आणि ‘मिसरिप्रेजेंटेशन’च्या आधारावर नाकारू शकत नाही. केवळ त्यात गैरप्रकार आढळून आल्यानंतर विमा कंपनी दावा नाकारू शकते.

फायदा काय होणार?

आरोग्याबाबतची माहिती लपविल्याच्या कारणावरून विमा कंपनीकडून दावा नाकारला जात होता; परंतु कंपनी या कारणावरून दावा नाकारू शकणार नाही. मधुमेह, हायरपरटेन्शन, अस्थमासारख्या आजारांची माहिती न दिल्याबद्दल दावा नाकारला जात होता; परंतु आता सलग पाच वर्षे हप्ता भरल्यानंतर कोणताही दावा नाकारला जाणार नाही.

‘पीईडी’साठी प्रतीक्षा कालावधीत घट

विमा कवच घेण्यापूर्वीपासून असलेल्या आजारांना विमा कवच देण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी चार वर्षांवरून तीन वर्षे करण्यात आला. यामुळे मधुमेह, थायरॉईड, हायपरटेन्शन, अस्थमा यासारख्या क्रॉनिक आजारांवर लवकरच विमा कवच मिळेल. याप्रमाणे पॉलिसीधारकांना जुन्या आजारांवर विम्याअंतर्गत उपचारांसाठी 36 महिन्यांपेक्षा अधिक काळ वाट पाहावी लागणार नाही. नवीन बदल एक एप्रिलपासून लागू झाले आहेत.

‘इर्डा’च्या अधिसूचनेनुसार, पूर्वीपासून असलेल्या आजाराचे निदान विमा कंपनीकडून जारी होणार्‍या पॉलिसीच्या तारखेच्या 36 महिने अगोदर झालेले असेल किंवा त्यावर उपचाराचा सल्ला दिला असेल तर अशा प्रकरणात प्रतीक्षा कालावधी हा 36 महिन्यांपेक्षा अधिक नसेल. इर्डाच्या मते, आरोग्य विमा लागू होण्यापूर्वी 36 महिन्यापर्यंत नमूद केलेल्या आजारांवरील उपचारासाठी (अपघात वगळता) कवच दिले जात नाही. कालावधी पूर्ण झाल्यानंतर या आजारांना, उपचारांना विमा कवच दिले जाईल. यासाठी एकच अट ती म्हणजे पॉलिसीच्या नूतनीकरणात खंड पडलेला नसावा.

सुलभ योजना आणाव्यात

नियामक संस्थेने म्हटले की, विमा कंपन्यांनी सुटसुटीत योजना आणण्याची गरज आहे. यानुसार पॉलिसीधारकांना योजनांची माहिती चटकन समजेल. विमा पॉलिसीतील शब्द हे विमा कवच आणि अटीतील पारदर्शकता आणि स्पष्टता आणणारे असावेत. पॉलिसीधारकांच्या हिताचे संरक्षण व्हायला हवे. सर्व जोखमीसंदर्भात निश्चित करण्यात येणारे मूल्य योग्य असावेत.

विमा कंपनीला द्यावी लागेल आजाराची माहिती

इर्डाने म्हटले, पॉलिसी खरेदी करताना विमाधारकाला आपल्या आजाराची संपूर्ण माहिती कंपनीला द्यावी लागेल. या आधारावर विमा कंपनी आरोग्य विम्यात पूर्वीपासून असलेल्या आजाराचा प्रतीक्षा कालावधी आणि विशिष्ट कालावधी कमी करण्याचा प्रयत्न करू शकते; मात्र हे नियम परदेशात प्रवासासाठी काढलेल्या पॉलिसीला लागू होणार नाही.

हप्ता परवडणारा असावा

आरोग्य विमा योजनेचा हप्ता हा परवडणारा असावा, अशी अपेक्षा इर्डाने व्यक्त केली आहे. परवडणारा हप्ता असावा आणि यात सर्व जोखमीचा समावेश असेल, याबाबत दक्षता कंपन्यांनी घ्यावी. अनावश्यक योजना परत घेण्याचाही विमा कंपनीने विचार करावा, असे इर्डाने म्हटले आहे.

कमाल वयाची अट काढली

आतापर्यंत विमा कंपन्यांना 65 वर्षांपर्यंतच्या व्यक्तीला नियमित आरोग्य विमा देणे बंधनकारक असायचे; परंतु आता नियमात बदल करत कमाल वयाची अट काढून टाकली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्याने विमा पॉलिसी बाजारात येतील. तसेच अधिक कस्टमाईज्ड आणि इनोव्हेटिव्ह हेल्थ पॉलिसी बाजारात येतील.

हेही वाचा : 

Back to top button