जामीन मिळविण्‍यासाठी केजरीवाल जाणीवपूर्वक गोड खातायत : ‘ईडी’चा न्‍यायालयात दावा | पुढारी

जामीन मिळविण्‍यासाठी केजरीवाल जाणीवपूर्वक गोड खातायत : 'ईडी'चा न्‍यायालयात दावा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍ली मद्‍य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात आहेत. केजरीवाल यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियमित डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी याचिका दाखल केली होती. यावर दिल्ली न्यायालयात आज (दि.१८) सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) उत्तर दिले.

जामीन मिळविण्‍यासाठी केजरीवाल जाणीवपूर्वक गोड खातायत : ईडीचा दावा

वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळववा म्‍हणून अरविंद केजरीवाल हे जाणीवपूर्वक दररोज गोड पदार्थ खात आहेत. त्यामुळे त्‍यांच्‍या शरीरातील साखरेची पातळी (शुगर लेव्हल) वाढली असल्‍याचा दावा सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर केला.

ईडीचे विशेष वकील जोहेब हुसेन म्हणाले, ” केजरीवाल यांचा डाएट चार्ट कोर्टासमोर ठेवण्यात आला आहे. डाएट चार्टमध्ये आंबे आणि मिठाईचा समावेश होता. आम्ही ते कोर्टासमोर ठेवले आहे. अरविंद केजरीवाल हे फक्त गोड पदार्थ खात आहेत. मधुमेही रुग्णाला याची परवानगी नाही. “टाईप 2 मधुमेह असूनही अरविंद केजरीवाल हे ‘आलू पुरी’, आंबे, मिठाई खात आहेत, वैद्यकीय कारणास्‍तव जामीनासाठी आधार तयार करण्‍यासाठी हे जाणीवपूर्वक गोड पदार्थांचे सेवन करत असल्‍याचही हुसेन यांनी न्‍यायलयास सांगितले.

उद्या पुन्‍हा होणार सुनावणी

या संपूर्ण प्रकरणावर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाकडून केजरीवाल यांच्या आहाराचा अहवाल मागवला आहे. आता या प्रकरणी उद्या (शुक्रवार, १९ एप्रिल) सुनावणी होणार आहे.

ईडीने जाणीवपूर्वक बनवलेला मुद्दा : ॲड. विवेक जैन

सुनावणीनंतर माध्‍यमांशी बोलताना केजरीवाल यांचे वकील विवेक जैन यांनी सांगितले की, “केजरीवाल हे तुरुंगात जाणीवपूर्वक गोड पदार्थ खात आहेत हा, ईडीने जाणीवपूर्वक बनवलेला मुद्दा आहे. कारण त्‍यांना घरी तयार होणारे भोजन बंद करायचे आहेत. त्‍यांचा आहार डॉक्टरांनी सांगितलेल्या सल्‍ल्‍याप्रमाणेच आहे. ही बाब आहे. न्यायप्रविष्ट आहे, आम्हाला याव अधिक काहीही बोलायचे नाही.”

 

 

Back to top button