Pune : आयुष रुग्णालयात क्षारसूत्र शस्त्रक्रिया.. | पुढारी

Pune : आयुष रुग्णालयात क्षारसूत्र शस्त्रक्रिया..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : औंध जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत फेब्रुवारी महिन्यात 30 खाटांच्या आयुष रुग्णालयाचे लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. राज्यातील पहिल्या आयुष रुग्णालयात सध्या आयुष, होमिओपॅथी, युनानी याचे बाह्यरुग्ण विभाग आहेत. रुग्णालयात लवकरच क्षारसूत्र शस्त्रक्रियाही सुरु केल्या जाणार आहेत. तसेच, नॅचरोपॅथी उपचारही सुरु होणार आहेत.

आजकालची बदलती जीवनशैली आणि आहारविहार यांमुळे वेगवेगळे आजार उद्भवत आहेत. मूळव्याध, भगंदर अशा आजारांमध्ये बर्‍याचदा तीव्र वेदना, दुखणे बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया कराव्या लागतात. यासाठी क्षारसूत्र पध्दतीचा वापर केला जातो. सध्या ही पध्दत फार कमी ठिकाणी वापरली जाते. राज्यात प्रथमच औंध येथील आयुष रुग्णालयात आता ही शस्त्रक्रिया आयुर्वेदतज्ज्ञांकडून केली जाणार आहे.

नऊ कोटींचा खर्च

औंध जिल्हा रुग्णालयाच्या मागील बाजूस आयुष रुग्णालयाची मोठी भव्य इमारत आहे. येथील 30 खाटांच्या आयुष रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत 8 कोटी 99 लाख रुपये म्हणजेच जवळपास नऊ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. गेल्या दीड महिन्यात जवळपास अकराशे रुग्णांनी येथील बाह्यरुग्ण उपचार विभागात उपचार घेतले आहेत.

आयुष रुग्णालयात मिळणार्‍या सुविधा

  •  तळमजल्यावर योगा हॉल, प्रतीक्षा कक्ष, अभिलेख कक्ष, उपहारगृह, प्रक्रिया कक्ष, वैद्य कक्ष, मुख्य वैद्य कक्ष, पी.जी. एम आयुर्वेद कक्ष, स्वच्छता गृह, वैद्यकीय अधिकारी हॉमियोपॅथी, वैद्यकीय अधिकारी कक्ष, युनानी, प्रयोगशाळा, मड बाथ नॅचरोपॅथी, नॅचरोपॅथी सुविधा उपलब्ध आहेत.
  •  पहिल्या मजल्यावर गर्भसंस्कार हॉल, मिटींग हॉल, विशेष कक्ष, स्वच्छता गृह, निजंतुकीकरण कक्ष, वैद्यकीय अधिकारी रुम, स्क्रब रुम, शस्त्रक्रिया गृह, रिकव्हरी रुम, शस्त्रक्रियापूर्व दक्षता कक्ष, पुरुष कक्ष, महिला कक्ष, प्रतिक्षा कक्ष, शुश्रुषा कक्ष अशा सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

आयुष रुग्णालयात सध्या आयुष, होमिओपॅथी, युनानी या सेवांच्या बाह्य रुग्ण विभागात गेल्या दीड महिन्यात जवळपास अकराशे रुग्णांनी उपचार घेतले आहेत. लवकरच क्षारसूत्र शस्त्रक्रिया सुरू केल्या जाणार आहेत.

डॉ. बालाजी लकडे, वैदयकीय अधीक्षक, आयुष रुग्णालय औंध

हेही वाचा

Back to top button