यवत : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेचा उपयोग विरोधकांना जेलमध्ये पाठवण्यासाठी केला. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स या संस्थामार्फत मोदींनी देशातील झारखंड आणि दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पश्चिम बंगालमधील पाच नेते यांना जेलमध्ये टाकण्यासाठी सत्तेचा वापर केल्याचा आरोप ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केला. यवत (ता. दौंड) येथे शेतकरी मेळावा व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (दि. 15) आयोजित सभेत शरद पवार बोलत होते.
ते म्हणाले, मोदी यांनी देशाची सत्ता हातात घेऊन 10 वर्षे झाली. आता त्यांच्या कामाचा हिशेब करण्याची वेळ आली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेले आहेत. घरगुती गॅसचे भाव गगनाला भिडले आहेत. फक्त जाहिराती करायच्या आणि सत्ता मिळवायची, असे मोदींचे धोरण आहे.
सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात आल्यानंतर शरद पवार यांनी यवतमध्ये भाजप आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यावर टीका करणे टाळले. तालुक्यातील कुल आणि थोरात यांच्यावर टीका केली, तर त्यांचे कार्यकर्ते सुळे यांच्याविरोधात काम करतील त्यामुळे शरद पवार यांनी टीका करणे टाळल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा