Indian Navy : भारतीय नौदलापुढील आव्हाने | पुढारी

Indian Navy : भारतीय नौदलापुढील आव्हाने

हेमंत महाजन, ब्रिगेडियर (निवृत्त)

भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्यामार्गे लाल समुद्र व एडनच्या आखातातून अरबी समुद्र ते हिंद महासागर असा हा विस्तीर्ण आणि व्यापारीद़ृष्ट्या मोक्याचा जलमार्ग आहे. या समुद्रात ड्रोनविरोधी युद्धाची रणनीती अजूनही पूर्ण विकसित झालेली नाही. हुतींनी निर्माण केलेल्या आव्हानावर मात करण्यासाठी भारताला तांत्रिक सुधारणा आणि कारवाई करताना इतर देशांशी समन्वय जरूरी आहे. भारतासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये सामील होणे, हा एक व्यवहार्य पर्याय आहे.

इस्रायल-गाझा संघर्षामध्ये इस्रायलच्या बाजूने आणि हमास-पॅलेस्टाईनच्या बाजूने काही देश व दहशतवादी संघटना खेचल्या गेल्या; मात्र येमेनस्थित हुती बंडखोरांकडून पूर्णपणे वेगळ्या दिशेने हमासच्या समर्थनार्थ इस्रायलविरोधी हल्ले सुरू झाले आहेत. या हल्ल्यांचा रोख लाल समुद्रातील इस्रायली आणि इस्रायल मित्रदेशांच्या व्यापारी जहाजांकडे आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले होत आहेत. हा भारतासाठी मोठा धोका आहे. भारताचा 20 टक्के व्यापार लाल समुद्रातून होतो. काही दिवसांपूर्वी या धोक्याची चुणूक दिसून आली. सोमालियाजवळ एका जहाजाचे अपहरण झाले. या जहाजाच्या एकूण 21 क्रू मेंबरपैकी 15 भारतीय होते. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदलाने, नंतर नौदलाच्या मार्कोस कमांडोंनी क्रू मेंबर्सची सुटका केली.

हुतीकडून आलेल्या या क्षेपणास्त्रांपासून रक्षण करण्यासाठी अमेरिका, मित्रदेशांच्या नौदल नौका सक्षम आहेत; परंतु व्यापारी जहाजे आणि मालवाहू टँकरना अशा प्रकारे सुसज्ज सुरक्षा व्यवस्था बाळगता येत नाही. लाल समुद्रातील वाहतूक महत्त्वाची आहे; कारण भूमध्य समुद्रातून सुएझ कालव्यामार्गे लाल समुद्र व एडनच्या आखातातून अरबी समुद्र ते हिंद महासागर असा हा विस्तीर्ण आणि व्यापारीद़ृष्ट्या मोक्याचा जलमार्ग आहे. काही नौदलांकडे हवेत आणि समुद्रात उडणार्‍या ड्रोनशी प्रभावीपणे मुकाबला करण्याची साधन व क्षमता आहे. ड्रोन हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञान म्हणजे ‘जॅमिंग’ आणि ‘स्पूफिंग’; परंतु हे तंत्रज्ञान व्यापारी जहाजांसाठी उपलब्ध नाही. त्यांना हे तंत्रज्ञान देणे सोपे नाही. ‘जॅमिंग’मध्ये मैत्रीपूर्ण प्रणालीमध्ये हस्तक्षेप करण्याचीही क्षमता आहे, म्हणजे गैरवापर शक्य आहे.

‘स्पूफिंग’ हे ड्रोन नियंत्रण प्रणालीला गोंधळात टाकण्यासाठी उपयुक्त ठरते; पण हे जहाजाच्या नियंत्रणातही अडथळा आणू शकते. सशस्त्र ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी लेसर प्रणाली आणि उच्च शक्तीची मायक्रोवेव्ह शस्त्रे यासारखी निर्देशित ऊर्जा शस्त्रे प्रभावी आहेत; परंतु तंत्रज्ञान महाग आहे आणि बहुतेक जहाजांच्या आवाक्याबाहेर आहेत. समुद्रात ड्रोनविरोधी युद्धाची रणनीती अजूनही पूर्ण विकसित झालेली नाही. हुतींच्या आव्हानावर मात करण्यासाठी भारताला तांत्रिक सुधारणा आणि कारवाई करताना अन्य देशांशी समन्वय जरूरी आहे. सशस्त्र ड्रोनचा सक्रियपणे सामना करण्यासाठी भारतीय नौदलाला अधिक सक्षम भागीदारांच्या साथीने काम करणे आवश्यक आहे.

भारतासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील युतीमध्ये सामील होणे हा एक व्यवहार्य पर्याय आहे. भारतीय नौदल हे अलीकडेच 39 देशांतील नौदलांचा सहभाग असलेल्या (अमेरिकाप्रणीत) संयुक्त सागरी दलाचे म्हणजे सीएमएफचे पूर्ण सदस्य बनले आहे. या आघाडीचा एक भाग म्हणून भारतीय नौदल लाल समुद्राच्या दक्षिण टोकापासून एडनच्या आखातापर्यंत आणि त्यापलीकडे पसरलेल्या समुद्रमार्गापर्यंत ‘सेफ मॅरिटाईम कॉरिडॉर’ तयार करण्यात मदत करू शकते. हुतींना इराणचे शस्त्रास्त्रे आणि संपत्तीच्या माध्यमातून पाठबळ आहे. सौदी अरेबियाविरुद्ध येमेनमध्ये वरचष्मा गाजवण्यासाठी इराणने हुतींना सुसज्ज केले. यातून ते शिरजोर बनले. आता ते इराणचेही ऐकत नाहीत.

इस्रायल आणि अमेरिका या शत्रूंविरोधात इस्रायली भूमीशिवाय लाल समुद्र, अरेबियन समुद्र, हिंदी महासागरात चाललेले ड्रोन व क्षेपणास्त्रांचे हल्ले जागतिक आणि भारताच्या व्यापार आणि अर्थव्यवस्थेच्या द़ृष्टीने धोकादायक आहेत. भारताचा 20 टक्के व्यापार या समुद्रातून होतो. इस्रायलमध्ये नोंदणी झालेल्या ‘एमव्ही केम प्लुटो’ या रसायनवाहू जहाजावर गुजरातपासून 200 नॉटिकल मैलांवर हल्ला झाला. लाल समुद्रातून मोठ्या प्रमाणात तेलाची वाहतूकही होते. आता तेलवाहू जहाज कंपन्यांनी वाहतुकीवर अतिरिक्त जोखीम मूल्य आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर दोन ते पाच टक्क्यांनी वाढले आहेत.

भारतीय नौदलाच्या 100 दिवसांच्या संकल्प मोहिमेचा 23 मार्चला समारोप झाला. डिसेंबर 2023 च्या मध्यावर ही मोहीम सुरू झाली होती. या कालावधीत हिंद महासागरात सागरी सुरक्षेशी संबंधित 18 घटना भारतीय नौदलाने शीघ्र आणि प्रथम प्रतिसाद देत हाताळल्या. इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाने संकल्प अंतर्गत सागरी सुरक्षा मोहिमांची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढवली होती. 100 दिवसांत नौदलाची जहाजे, विमाने आणि विशेष दलांनी सागरी सुरक्षेसाठी आणि सागरी सेवेत कार्यरत समुदायाचे विविध अपारंपरिक धोक्यांपासून रक्षण केले.

या क्षेत्रातील धोक्यांविषयीच्या माहितीचे आकलन झाल्यानंतर एडनचे आखात आणि लगतचा प्रदेश, अरबी समुद्र तसेच सोमालियाचा पूर्व किनारा अशा तीन भागांत ही संकल्प मोहीम राबविण्यात आली. भारतीय नौदलाच्या या प्रयत्नांमध्ये भारताच्या सागरी हितांचे रक्षण करणे, सागरी धोक्यांचा सामना करणे, नव्याने डोके वर काढणार्‍या चाचेगिरीला विरोध करणे तसेच भारतीय सागरी क्षेत्रात अमली पदार्थांचा व्यापार लक्षणीयरीत्या कमी करणे अशा कामगिरींचा समावेश आहे; मात्र भारतीय नौदल सदैव तैनात करणे खर्चिक असेल.

Back to top button