जलसंकट : बारामती एमआयडीसीला महिन्यापुरताच पाणीपुरवठा | पुढारी

जलसंकट : बारामती एमआयडीसीला महिन्यापुरताच पाणीपुरवठा

भिगवण : पुढारी वृत्तसेवा : यंदा एप्रिलमध्येच उजनीच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा खडखडाट झाला आहे. त्यामुळे पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे काय होणार असा प्रश्न भेडसावत असतानाच उद्योजकही चांगलेच धास्तावले आहेत. सध्याचा पाणीसाठा पाहता बारामती एमआयडीला कसाबसा महिनाभर पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाण्याचा प्रश्न एमआयडीसीला भेडसावणार आहे.
याबाबत कुंभारगाव येथील पाणीपुरवठा करणार्‍या जॅकवेलची बारामती डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, उपअभियंता विजय पेटकर यांच्यासह उद्योजकांनी पाहणी केली. या वेळी जामदार म्हणाले की, दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान पाण्याची टंचाई जाणवते. परंतु, गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने उजनी केवळ 60 टक्के भरले. त्यामुळे जानेवारीपासूनच टंचाई स्थिती जाणवू लागली आहे. सध्या धरणात उणे 38 टक्केच साठा आहे.

धरणातील कमी पाणीसाठा, तीव्र उन्हाळा व धरणाच्या खालील भागाला पाणी सोडावे लागत असल्याने एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उपाययोजनेवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. जामदार म्हणाले, धरणाच्या खालील भागाला 10 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीत घेण्यात आला. त्यानुसार 5 टीएमसी पाणी सोडण्यात आले. पाच टीएमसी पाणी देणे बाकी आहे. यात वाढ झाल्यास त्याचा परिणाम एमआयडीसीला जाणवण्याची शक्यता आहे. उपअभियंता पेटकर म्हणाले, 15 मे पर्यंत पाण्याबाबत चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर महामंडळ पर्यायी यंत्रणा उभारून पाण्याची पर्यायी व्यवस्था करेल. पाणीटंचाईमुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा

Back to top button