म्हातोबा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी विजय साखरेंची एकमताने निवड | पुढारी

म्हातोबा उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी विजय साखरेंची एकमताने निवड

हिंजवडी : चैत्र पौर्णिमेनिमित्त होत असलेल्या पारंपरिक ग्रामदैवत म्हातोबा उत्सवनिमित्त पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याला उत्सव तयारीची आढावा बैठक सालाबादप्रमाणे यंदा मास्ती मंदिरात पार पडली. या बैठकीत ‘म्हातोबा उत्सव कमिटी’च्या अध्यक्षपदी विजय लक्ष्मण साखरे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी नवनाथ तानाजी साखरे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली. यंदाच्या उत्सवानिमित्त मालती इनामदार यांचा तमाशा, राधा मुंबईकर यांचा लावण्याचा कार्यक्रम तसेच टेकडीच्या पायथ्याला असलेल्या म्हातोबा क्रीडा संकुलात निकाली कुस्त्याचा भव्य आखाडा भरविण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती माजी अध्यक्ष संदीप साखरे यांनी दिली.

मात्र यावेळी उत्सव कमिटीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा सर्वत्र होत आहे. मागील काही वर्षात याच जागृत असलेल्या ग्रामदैवत महातोबाच्या शपथ आणि आणाभाका घेऊन अनेक जण ऐन वेळी पालटले असल्याने सत्ताबदल झाले आहे. त्यामुळे हा पांचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे. अनेकदा म्हातोबा देवाच्या गाभाऱ्यात व्हिडीओ शूटिंग करून, शपथ घेतली जात असते आणि नंतर पुन्हा वेगळी वाट धरली जात असते त्यावर नियंत्रण आणण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. —– राजकीय कारणासाठी ग्रामदैवत म्हातोबाच्या शपथा घेतल्यास बहिष्कार… ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक उमेदवारांनी एकमेकांना उमेदवारीबाबत शब्द देताना तसेच निवडून आलेल्या पॅनेलशी एकनिष्ठ राहण्याच्या, भ्रष्टाचार करणार नसल्याच्या शपथा ग्रामदेवत म्हातोबा देवासमोर राख उचलून घेतल्या होत्या.

परंतु नंतरच्या काळात अनेकांनी या निर्णयास तिलांजली देत या शपथा मोडीत काढल्या. व्हिडीओ आपापल्या सोयीनुसार इतरत्र व्हायरल केले होते. त्यामुळे जागृत देवस्थान असलेल्या म्हातोबा समोर घेतलेल्या शपथा संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे आगामी काळात कुणीही ग्रामदैवताची शपथ घ्यायची नाही आणि घेतलीच तर ती पाळली पाहिजे न पाळणारास गावात कुठल्याही कार्यक्रमात सहभागी होऊ द्यायचे नाही. संपूर्ण गावाने त्याच्यावर बहिष्कार टाकायचा असा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यामुळे आता भविष्यात देवाच्या राजकीय शपथ विधीला आळा बसेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गावातील सर्व जुन्या जाणत्या मंडळींना विश्वासात घेऊन गावाचा पारंपरिक उत्सव भक्तिभावाने तसेच शांततेत पार पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. या जबाबदरीमुळे ग्रामस्थांच्या विश्वासास पत्र ठरलो आहे.

– विजय साखरे, नवनिर्वाचित अध्यक्ष.

हेही वाचा

Back to top button