प्रियकराचा मृतदेह घेऊन ‘ती’चा ४८ तास प्रवास, पण अखेर हत्येचे बिंग फुटले | पुढारी

प्रियकराचा मृतदेह घेऊन 'ती'चा ४८ तास प्रवास, पण अखेर हत्येचे बिंग फुटले

प्रवीण आजगेकर, गडहिंग्लज

एखादी स्त्री सुडाने पेटली, तर ती कोणत्या थराला जाईल, काही सांगता येत नाही. राजेंद्रने सुनीताचा विश्वासघात केला होता, तिच्यासोबत संसाराच्या आणाभाका घेऊन तिच्या भावनेचा बाजार मांडला होता. त्यामुळे सुडाने पेटलेल्या सुनीताच्या सुडाग्नीत राजेंद्रचे आयुष्य तर भस्मसात झालेच; पण त्याला खरोखरीच भस्मसात करण्याच्या प्रयत्नात सुनीताच्याही उभ्या आयुष्याची होरपळ झाली…

सुनीता ही एक कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील हासूर सासगिरी या एका खेडेगावातील महिला. नजीकच्या गावातीलच एका तरुणासोबत तिचे लग्न झाल्यानंतर ती पतीसोबत मुंबईत येऊन स्थायिक झाली. लग्नानंतर सुनीताला एक मुलगाही झाला; पण तिचा संसार काही सुखाचा होऊ शकला नाही. काहीतरी कारणावरून नवर्‍याचे आणि तिचे बिनसले आणि दोघेही विभक्त झाले. पदरी एक लहान मुलगा असल्याने पोटापाण्यासाठी सुनीता चार घरची धुणीभांडी करून संसार चालवू लागली. सुनीता जरी धुणीभांडी करीत असली, तरी गाठीला गाठ मारून पोटच्या लेकरासाठी म्हणून ती बर्‍यापैकी पैसे बाळगून होती.

अशातच एकेदिवशी तिचा राजेंद्र याच्याशी परिचय झाला. हा परिचय हळूहळू वाढत गेला आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. राजेंद्र हा मूळचा परभणी जिल्ह्यातील होता आणि कामाधंद्याच्या निमित्ताने तोही मुंबईतच स्थायिक झाला होता. प्रेमसंबंधातून राजेंद्रचे नित्यनेमाने सुनीताच्या घरी जाणे-येणे होते. त्याने सुनीताला लग्नाचेही आमिष दाखविले होते. प्रेमसंबंध आणि लग्नाच्या आणाभाका घेत राजेंद्रने सुनीताकडून बरीच मोठी रक्कम उकळली होती. मात्र, सुनीताने लग्नाचा विषय काढला, की राजेंद्र काही तरी कारण सांगून वेळ मारून नेत होता. काही दिवस सुनीता त्याच्या भूलथापांना ती बळी पडली; मात्र हळूहळू राजेंद्र आपणाला फसवत असून, तो काही आपल्याशी लग्न करणार नसल्याची सुनीताला खात्री पटली. त्यानंतर मग तिने राजेंद्रला उसने दिलेले पैसे मागण्यास सुरुवात करताच त्याने पैसे देण्यासही टाळाटाळ सुरू केली. मग मात्र सुनीता चवताळली आणि काहीही करून राजेंद्रला धडा शिकवायचे तिने ठरविले.

हळूहळू पैशाच्या कारणावरून सुनीता आणि राजेंद्र यांच्यात भांडणतंटा सुरू झाला. त्यामुळे सुनीताच्या मनातील सुडाग्नी दिवसेंदिवस भडकतच चालला. लग्नही नाही अन् पैसेही मिळत नसल्याने संतापलेल्या सुनीताने एकेदिवशी गोड बोलून राजेंद्रला खोलीत बोलावून घेतले. खाण्या-पिण्यातून त्याच्या पोटात झोपेच्या भरपूर गोळ्या उतरविल्या अन् एका मित्राला बोलावून घेत तिने राजेंद्रचा गळा आवळून त्याचा खेळ खल्लास करून टाकला. राजेंद्रला संपविले खरे, मात्र त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायची कशी, हा गहन सवाल रात्रभर तिच्या डोक्यात घोळत होता. या विचारातच तिने अख्खी रात्र मृतदेहासोबत एकटीने घालविली. दुसर्‍या दिवशी सकाळी तिने मृतदेह सामावेल अशी प्रवासी बॅग खरेदी केली. या बॅगेत तिने राजेंद्रचा मृतदेह कोंबला. मृतदेह बॅगेत कोंबताना तिच्या डोक्यात केवळ सुडाग्नीच नाचत होता. राजेंद्रने आपल्याशी केलेल्या प्रतारणेचा राग तिच्या डोक्यात घुसळत होता. राजेंद्रचा मृतदेह कोकरातील एखाद्या निर्जन भागात नेऊन पेटवून टाकून पुरावा नष्ट करण्याचा तिचा बेत होता.

त्यानुसार तिने मुंबईतून एक टॅक्सी भाड्याने ठरवली आणि राजेंद्रचा मृतदेह चालकाच्या मदतीने तिने गाडीच्या डिक्कीत ठेवला आणि चेहर्‍यावर कोणत्याही भावनांचा लवलेश न दाखविता तिने मृतदेहासोबत चक्क मुंबई ते कोल्हापूर जिल्हा इतका जवळपास 500 कि.मी. चा प्रवास केला. या प्रवासात अनेक ठिकाणी चेकनाके होते, गर्दी होती. मात्र, या सगळ्याला चकवा देत राजेंद्रचा मृतदेह आजरा तालुक्यातील मुमेवाडी घाटापर्यंत आणला. त्यापूर्वी तिने पेट्रोल खरेदी करून मृतदेह जाळण्याचे नियोजन केले. मुमेवाडी घाटात निर्जनस्थळ पाहून सुनीताने एकटीने मृतदेह असलेली बॅग ओढत एका निर्जन ठिकाणी नेली. मृतदेहाची बॅग उघडून ती मृतदेहावर पेट्रोल ओतणार इतक्यात तिच्या नशिबाने तिला दगा दिला अन् पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांना या निर्जनस्थळी थांबलेल्या टॅक्सीची शंका आली आणि त्यांनी चौकशी करताच राजेंद्रच्या हत्येचे बिंग फुटले.

मृतदेहासोबत 48 तास!

खून झालेला दिवस अन् सुनीता पोलिसांच्या हातात सापडलेली वेळ पाहिली, तर जवळपास 48 तास ती प्रियकराला मारून त्याचा मृतदेह घेऊन प्रवास करत होती. भावनाशून्य मनाने आणि चेहर्‍याने तिने केलेले कृत्य आणि त्यानंतर रचलेला बेत हा तिच्यातील सुडाग्नीची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही. कदाचित पेट्रोल ओतून तिने मृतदेह जाळला असता, तर पोलिसांना तिच्यापर्यंत पोहोचताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असते. मृतदेहासोबतच्या तिच्या या प्रवासाने तिच्या मनातील सुडाग्नीच्या ज्वालांनी मात्र सीमा ओलांडली, हे नक्की.

Back to top button