वेध लोकसभेचे – बीडमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले | पुढारी

वेध लोकसभेचे - बीडमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले

उमेश काळे

बीड हा भाजपचा प्रतिष्ठेचा मतदारसंघ. भाजपचे दिवगंत नेते प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथराव मुंडे बीडचेच. पण हिंदुत्वाचे वातावरण असूनही बीड मध्ये मात्र भाजप कमळ फुलण्यास 1996 उजाडले. या निवडणुकीत भाजपने राजकीय खेळी करीत काँगे्रस नेते माजी मंत्री अशोक पाटील यांच्या पत्नी रजनी पाटील यांना उमेदवारी दिली. राजकीय समीकरण यशस्वी झाले आणि रजनी पाटील या केशरकाकू क्षीरसागर यांचा पराभव करीत निवडून आल्या. पुढील निवडणुकीत मात्र त्या भाजपच्या उमेदवार झाल्या नाहीत. त्यांनी स्वगृही जाणे पसंत केले. आता त्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या असून, काश्मीरच्या प्रभारी आहेत. राज्यसभेच्या त्या सदस्या आहेत. पण त्यांना पहिली संधी मिळाली ती भाजपकडून. त्यांचे पती अशोक पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते.

१९८५ ला चौसाळा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अपक्ष ज्ञानोबा देशमुख यांचा अडीच हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हा शंकरराव चव्हाण मंत्रिमंडळात त्यांचा सार्वजनिक बांधकाम खात्याचे राज्यमंत्री म्हणून समावेश झाला. परंतु नंतरच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली नाही. तेथून जयदत क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्यानंतर अशोक पाटील हे राजकीय विजनवासात गेले होते. स्थानिक पातळीवरच त्यांचे राजकारण चालू राहिले. रजनी पाटील या १९९० ला जिल्हा परिषदेवर निवडून आल्या. १९९६ ला त्यांनी काँग्रेसकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली, ती न मिळाल्यामुळे त्यांना भाजपने उमेदवार केले. १९९० नंतरच्या घडामोडीत त्या भाजपपासून दूर गेल्या आणि त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शरद जोशी पराभूत

या निवडणुकीत शिवसेनेने मोरेश्‍वर सावे यांना उमेदवारी नाकारत माजी महापौर प्रदीप जैस्वाल यांना तिकिट दिले. त्यांनी काँग्रेसचे सुरेश पाटील यांचा ११४,५७९ मतांनी पराभव केला. हिंगोलीतून शिवसेनेचे शिवाजी माने, जालन्यात उतमसिंह पवार, लातूरला शिवराज पाटील चाकूरकर, नांदेड मतदारसंघात गंगाधरराव कुंटूरकर, परभणीत सुरेश जाधव, धाराशिवला शिवसेनेचे शिवाजी कांबळे यांनी बाजी मारली. या निवडणुकीत नांदेडमधून शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी उभे होते. परंतु त्यांना ७१ हजार मते मिळाली. प्रा. अशोक देशमुख, विलास गुंडेवार या दोन्ही बंडखोर शिवसेना खासदारांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. परंतु त्यांना मतदारांनी साफ नाकारले.

Back to top button