एक सहायक निबंधक कार्यालय भाड्याने अन् दुसरे मोडकळीस.. | पुढारी

एक सहायक निबंधक कार्यालय भाड्याने अन् दुसरे मोडकळीस..

विनोद माझिरे

पिरंगुट : कोट्यवधी रुपयांचा महसूल देणार्‍या मुळशी तालुक्याला दोनच सहायक दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. तिसरे मंजूर झाले आहे. परंतु, जागेअभावी ते सुरू होत नसल्याची माहिती आहे. त्यामधील पौड येथील कार्यालय तर अतिशय बिकट अवस्थेत आहे. दरवर्षी त्याची डागडुजी करावी लागते, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही तसेच महिलांसाठी आणि पुरुषांसाठी कुठल्याही प्रकारचे स्वच्छतागृह उपलब्ध नाही. एकूणच, हे कार्यालय म्हणजे ’असून अडचण नसून खोळंबा’ अशी परिस्थिती आहे. पौड येथील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त करण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या गाड्या लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे पौडमध्ये गाड्या कुठेही लावल्या जातात आणि वाहतुकीचा खोळंबा होऊन कोंडी होते.

दुसरे कार्यालय हिंजवडी येथे आहे, ते देखील भाड्याच्या जागेमध्ये आहे. त्या ठिकाणीसुद्धा पौडसारखीच गंभीर परिस्थिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुळशीकरांना या हालअपेष्टा भोगाव्या लागत आहेत. या सर्व सुविधा मुळशी तालुक्यातील तसेच मुळशी तालुक्यामध्ये जमीन खरेदी करणारे नागरिक मुकाट्याने सहन करीत आहेत. या अडचणी गेल्या 10 व 15 वर्षांपूर्वीच सुटायला पाहिजे होत्या; मात्र तसे झाले नाही. मुळशी तालुक्यामध्ये येण्यासाठी अनेक मार्ग आहेत. त्यामधील मुख्य मार्ग म्हणजे पुणे-कोलाड-दिघी बंदर राष्ट्रीय महामार्ग हा आहे. या महामार्गाच्या कामावर एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव अपघातामध्ये गमवावा लागला आहे.

या महामार्गावर अगदी बोटावर मोजण्याइतकीच बसथांबे आहेत. पिरंगुट, भुगाव, घोटावडे फाटा, माले, मुळशी ही तालुक्यातील प्रमुख बाजारी गावे आहेत. त्या ठिकाणी देखील बसथांबे नाहीत. आजही मुळशीकर नागरिकांना पुण्याला जाण्यासाठी किंवा पुण्यातून गावी येण्यासाठी भर उन्हात उभे राहावे लागत आहे, तर पावसाळ्यामध्ये पाऊस अंगावर झेलत बसची किंवा वाहनाची वाट पाहावी लागत आहे.
पौड येथील तालुक्याच्या मुख्य बसस्थानकाला घाणीने वेढा घातलेला आहे.

हे बसस्थानकसुद्धा मोडकळीस आलेले असून, तेथे नवीन प्रशस्त बसस्थानक उभे करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यामध्ये पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक तसेच सीएनजीवर चालणार्‍या बसची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे पौड येथील बसस्थानकामध्येच चार्जिंग स्टेशन आणि सीएनजी गॅस पंपाची व्यवस्था होणे गरजेचे आहे. हे झाले तर पौड येथून कोळवण खोरे, मुळशी धरण परिसर, मुठा खोरे, रिहे खोरे या ठिकाणी जाण्यासाठी बसगाड्यांची व्यवस्था होईल आणि तो भाग विकसित होण्यास हातभार लागेल.

स्वच्छतागृहाअभावी महिलांची कुचंबणा

महिलांना लघुशंकेसाठी जाण्यासाठी अतिशय अस्वच्छ आणि घाणेरडी स्वच्छतागृहे आहेत. तिकडे कोणीही जात नाही. महिलांसाठीच्या स्वच्छतागृहाला कायम कुलूप लावलेले असते. त्यामुळे त्या ठिकाणी महिलांची कुचंबणा होत आहे.

हेही वाचा

Back to top button