जलसंकट! जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा; प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन | पुढारी

जलसंकट! जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा; प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन

बारामती : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात सध्या 76 गावांतील 1 लाख 19 हजार लोकसंख्येला 76 टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली. टँकरची मागणी आल्यावर तत्काळ टँंकर सुरू करावेत. याबाबत कार्यालयीन अकार्यक्षमता खपवून घेतली जाणार नाही. उशिरा टँकर सुरू झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला.

बारामती पंचायत समिती सभागृहात त्यांनी टंचाई स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, जलसंपदाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे, कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, जिल्हा कृषी अधीक्षक संजय काचोळे, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.

निरा खोर्‍यातील भाटघर, वीर, निरा देवघर, गुंजवणी या धरणांमध्ये 14.77 टीएमसी पाणी आहे. त्यातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले असून, जूनअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण येणार नाही. बारामती तालुक्यात लोणी भापकर येथील एमजीपीची योजना कार्यान्वित होत आहे. सुपे येथील योजनेबाबत अभयारण्यातून पाइप लाइन न्यावी लागत असून, तो विषय मार्गी लावत आहोत. वन्य पशुपक्ष्यांसाठीही टँकरने पाणी उपलब्ध करून दिले जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

जिल्ह्यात काही भागात अद्याप साखर कारखाने सुरू आहेत. अजून आठ दिवस हे कारखाने चालतील. त्यामुळे सध्या तरी चाराटंचाई जाणवत नाही. रब्बीतील पेरणीचे क्षेत्र दुपटीने वाढले असून, चारा पीक अनेक ठिकाणी घेण्यात आले आहे. बारामती, पुरंदरमध्ये दुग्ध व्यवसाय मोठा आहे. जनावरांसाठी चार्‍याबरोबरच पाणीटंचाई भासू नये, याची काळजी घेतली जात आहे. शेतकर्‍यांना 15 टन बियाण्यांचे वाटप केले जाणार असून, गावनिहाय याद्या तयार केल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

सर्वाधिक टँकर पुरंदर तालुक्यात

जिल्ह्यात सर्वाधिक 51 टँकर पुरंदरमध्ये सुरू आहेत. बारामतीत 21, आंबेगावला 10, दौंडला 6, जुन्नरमध्ये 5, हवेलीमध्ये 3, तर इंदापूरमध्ये दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बारामतीत 10 गावे व 129 वाड्या-वस्त्यांना 21 टँकरने पाणी दिले जात आहे. खडकवासल्यातून 8 एप्रिलला आवर्तन सुटणार आहे. त्याद्वारे तलाव भरून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे बारामतीत टँकरची संख्या दोन-तीनने कमी होईल. टँकरला जीपीएस यंत्रणा असल्याने टँकर भरणे, पोहोचणे, खेपा ही सर्व माहिती उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिसुर्फळ, सुपे तलाव पाण्याने भरणार

टँकरचे अधिकार प्रांतस्तरावरच देण्यात आले आहेत. खडकवासल्याद्वारे शिर्सुफळ, सुपे येथील तलाव भरून घेतले जाणार आहेत. सहा टीएमसी पाण्यापैकी पिण्याचे पाणी राखीव ठेवले असून, खडकवासल्यातून मेमध्ये दुसरे आवर्तन दिले जाणार असल्याचेही जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

पुणे, पिंपरी, जेजुरीत बांधकामांना पाणी नाही

पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात जेजुरीत बांधकामांना पाणी दिले जाणार नाही. अन्य ठिकाणी सर्व्हे केला जात असून, त्यानुसार निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली.

गरज भासल्यास कटू निर्णय

टंचाईच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास कटू निर्णय घ्यावे लागतील. इंदापूरला उजनी बॅक वॉटर क्षेत्रात वीजपुरवठा बंद करावा लागेल. जिल्ह्यात विहिरींचे अधिग्रहण करावे लागेल. टंचाई स्थितीत सर्व विभाग समन्वयाने काम करत असून, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.

हेही वाचा

Back to top button