श्रीनिवास पाटील यांनी सुचवले सारंगबाबांचे नाव | पुढारी

श्रीनिवास पाटील यांनी सुचवले सारंगबाबांचे नाव

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईत झालेल्या बैठकीत उपस्थितांनी श्रीनिवास पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. मात्र, आपण लढणार नसून सारंगबाबांना उमेदवारी द्यावी, असे सुचवले. त्यातच शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव हेही शरद पवारांना भेटले. या सर्व घडामोडींबाबत पवारांनी निर्णयाबाबत आ. शशिकांत शिंदे यांनाही विचारणा केली असून गुरुवारी होणारा निर्णय लांबणीवर गेला आहे. दोन दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस सातारा व माढ्याच्या जागेवर उमेदवारांची नावे निश्चित करणार आहे.

गुरुवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला सातार्‍याच्या तिढ्याबाबत चर्चा झाली. आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदार संघाचा अहवाल शरद पवार यांना दिला. बैठकीत आ. शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातून श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीची मागणी होत आहे. त्यांनी उमेदवारी करावी, असे सांगितले. त्यावर श्रीनिवास पाटील यांनी सारंगबाबांना उमेदवारी देण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर काही वेळ चर्चाही झाल्याचे समजते. मात्र, याबाबतचा निर्णय गुरुवारी झाला नाही. पवारांनी अन्य ठिकाणच्या जागा गुरुवारी जाहीर केल्या. सातारा व माढ्याची जागा त्यांनी जाहीर केली नाही.

त्यातच गुरुवारी शिवसेनेचे पुरुषोत्तम जाधव तिसर्‍यांदा शरद पवारांना भेटले. आपली उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कशी फायद्याची आहे हे त्यांनी पवारांना सांगितले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही भेट घेतली. पवारांनी याबाबत आ. शशिकांत शिंदे यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना आ. शशिकांत शिंदे यांनी पवारांच्या भेटीचा वृत्तांत सांगितला.
माढ्याबाबत अद्यापही उमेदवारी निश्चिती झाली नाही. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी गुरुवारी शरद पवारांची भेट घेतली असल्याचे समजते. शिवाय डॉ. अनिकेत देशमुख यांच्यासाठी बाबासाहेब देशमुख यांनीही पवारांची भेट घेतली. सातारा व माढ्याबाबत पवार ताकही फुंकून पित आहेत. त्यामुळे सातारा व माढ्याचा निर्णय दोन दिवसांत होणार असल्याचे समजते.

Back to top button