कामगारांचे पगार थकले, गडहिंग्लजकर पाण्याला मुकले | पुढारी

कामगारांचे पगार थकले, गडहिंग्लजकर पाण्याला मुकले

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा गडहिंग्लज नगरपालिकेकडे ठेकेदारी पद्धतीने पाणी सोडण्यासाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने तसेच अन्य बाबी अडचणीच्या ठरल्याने कर्मचाऱ्यांनी १ एप्रिल पासून काम बंद आंदोलन केले आहे. याचा फटका गडहिंग्लज शहरवासीयांना बसला असून आज शहरामध्ये पाणीपुरवठा झाला नाही. त्‍यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गडहिंग्लज नगरपालिकेच्यावतीने तांत्रिक अडचणीमुळे आज पाणी येणार नसल्याचे कळवले आहे. असे असले तरी त्यावर मात्र सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसत आहे.

गडहिंग्लज पालिकेकडे सध्या ठेक्यावरून अनेक बाबी घडताना दिसत आहेत. पगार थकल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून थेट शहरवासीयांनाच पाण्यापासून अलिप्त ठेवले आहे. त्‍यामुळे या विषयाची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारांसह कर्मचाऱ्यांना बोलावून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले असले तरी ऐन उन्हाळ्यात झालेल्या या पाणीटंचाईच्या अडचणीमुळे गडहिंग्लजकर मात्र त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाने अशा बाबतीत गांभीर्याने लक्ष देऊन संप अथवा आंदोलने होण्यापूर्वीच विषय संपवणे आवश्यक आहे. ऐन उन्हाळ्यात शहरात पाणीपुरवठा ठप्प झाल्‍याने नागरिकांतून असंतोष व्यक्त होत आहे.

हेही वाचा : 

Back to top button