Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत कोणाची बाजी? मतांच्या मूल्याची, की उपद्रवमूल्याची? | पुढारी

Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत कोणाची बाजी? मतांच्या मूल्याची, की उपद्रवमूल्याची?

राजेंद्र जोशी

ही महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते. या निवडणुकीत जनतेच्या प्रश्नाला सातत्याने वाचा फोडणारे, त्यासाठी रस्त्यावर संघर्ष करणारे आणि प्रसंगी सत्ताधार्‍यांशीही दोन हात करणारे उमेदवार निवडून लोकशाहीच्या सर्वोच्च सभागृहात स्थानापन्न होणे लोकशाहीला अभिप्रेत आहे. परंतु, अलीकडच्या काळात जनतेशी घट्ट नाळ जोडल्या गेलेल्या प्रतिनिधीला सभागृहात जाण्याची हमखास संधी मिळेल, अशी स्थिती नाही. याला पक्षीय समीकरणे, तात्कालिक स्थिती आणि जातीपातीचे राजकारण जबाबदार ठरते आहे. यामुळेच निवडणुकांमध्ये मतांच्या मूल्यापेक्षा उपद्रव मूल्यांना अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात सध्या ही स्थिती आहे. यामुळे यंदा मतांच्या मूल्याला अधिक किंमत द्यायची, की उपद्रव मूल्याच्या मागे लागायचे, याचा गांभीर्याने विचार मतदारांना करावा लागेल.

या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांना आपल्या बाजूला वळविण्यासाठी महाविकास आघाडीने प्रयत्न केले. शेट्टी यांनी महाविकास आघाडीला वगळून सेनेशी मोट बांधण्याचा प्रयत्न केला. पण या दोन्ही अयशस्वी प्रयत्नानंतर आता शेट्टींचे ‘एकला चलो रे’ सुरू आहे. कचाट्यात अडकलेली विद्यमान खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी सुटली आहे. ते महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरतानाच महायुतीच्या वळचणीला गेली काही वर्षे असलेल्या आवाडे गटाने बंडाचे निशाण फडकविले आहे आणि सोबतीला वंचित बहुजन आघाडीमार्फत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांनी लंगोट बांधला आहे. या लढतीमध्ये मतांची पॉकेटस् खाणारे व नामसद़ृश उमेदवार उभे करून लढत बहुरंगीही केली जाईल. अशा स्थितीत आता उमेदवारांपेक्षा मतदारांची कसोटी आहे. त्यांना निवडणुकीतील सापळा सोडवून योग्य उमेदवारामागे मत उभे करावे लागेल. मतांची विभागणी एखाद्या उमेदवाराला किती फटका देऊ शकते, याचे उत्तम उदाहरण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात दिसून आले आहे. या मतदारसंघात प्रारंभी शेट्टींच्या मागे उभे राहण्याचे अभिवचन देणार्‍या डॉ. प्रकाश आंबेडकरांनी ऐनवेळी आपला उमेदवार रिंगणात ठेवला.

या उमेदवारामागे नेहमी काँग्रेसच्या बाजूने वा भाजपविरोधात उभी राहणारी मते वंचित बहुजन आघाडीच्या पारड्यात पडली. तब्बल 1 लाख 23 हजार मते वंचितच्या उमेदवारांनी घेतली होती आणि शेट्टींचा पराभव 96 हजार 39 मतांनी झाला. या मतदारसंघात स्वर्गीय बाळासाहेब माने यांना जनतेने भरभरूनवेळा लोकसभेत पाठविले होते. तेव्हाही मतदारसंघाच्या राजकारणात जैन-मराठा वाद प्रबळ ठरत होता. हा मतदारसंघ इचलकरंजीपासून भुदरगडपर्यंत पसरला गेल्याने पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या पलीकडील गावांतील मतपेट्यांची मोजणी सुरू झाली, की बाळासाहेब माने बाजी मारत होते. हा वाद आजही मिटलेला नाही. कोणी कितीही समाजवादाच्या गप्पा मारीत असले, तरी जात पाहून मतदान करणार्‍या मतदारांची संख्या थोडीथोडकी नाही. यामुळे या मतदारसंघात चमत्कारिक स्थिती निर्माण होऊ शकते. हातकणंगले मतदारसंघात श्रीमती निवेदिता माने यांनी 1999 व 2004 मध्ये अनुक्रमे शिवसेना व राष्ट्रवादीच्या चिन्हावर दोन वेळेला दिल्ली गाठली. 2009 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर पराभूत झाल्यानंतर त्यांचे घराणे पुन्हा शिवसेनेत स्वगृही परतले.

यानंतर राजू शेट्टी यांनी 2014 मध्ये लागोपाठ दुसर्‍यांदा लोकसभा गाठली, तरी 2019 मध्ये त्यांना मतविभागणीचा मोठा फटका बसला होता. हा धक्का उपद्रवी मूल्यांचा होता. त्यानंतर धैर्यशील माने यांनी संयमी भूमिका घेत मतदारसंघात मोठा निधी आणला. विकासकामे सुरू केली. पण प्रत्यक्षात लोकांच्या आंदोलनात त्यांची अनुपस्थिती जाणवत होती. आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये शेट्टींना नेहमी पडद्यामागून मदत करणार्‍या आवाडे गटाचे राहुल आवाडे रिंगणात येण्याची तयारी करत आहेत. सोबतीला वंचितच्या तिकिटावर डी. सी. पाटील यांना उभे करून नवी खेळी खेळली जात आहे. या घडामोडीने शेट्टींमागे उभारणार्‍या जैन मतांची विभागणी करण्याचा सापळा टाकला गेला आहे. या सापळ्यातून शेट्टी किती सहीसलामत सुटतात, त्यावर त्यांची यश अवलंबून असेल. इथेच ऊस, दूध दराचे, शेतीमालाच्या हमीभावाचे, शेतकर्‍यांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नावरील आंदोलने महत्त्वाची ठरतात, की राजर्षी शाहूंच्या समतेच्या भूमीत जात महत्त्वाची ठरते, याचा फैसला निवडणूक निकालात दिसणार आहे.

Back to top button