अन् पाकिस्तानी खलाशांकडून ‘हिंदुस्थान झिंदाबाद’ च्या घोषणा | पुढारी

अन् पाकिस्तानी खलाशांकडून ‘हिंदुस्थान झिंदाबाद’ च्या घोषणा

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : समुद्रातील सोमालियन लुटारू म्हणजे एक अत्यंत क्रूर जमात. या समुद्री चाच्यांनी 23 पाकिस्तानी खलाशांना ओलिस ठेवलेले होते. केव्हा कुठला सोमालियन कोणत्या पाकिस्तान्याला ठार करेल, याचा नेम नव्हता आणि अशात भारतीय नौदल फरिश्ता म्हणून सामोरे येते. सोमालियन लुटारूंचा मुकाबला करते व पाकिस्तानी खलाशांचा जीव वाचविते! हे पाकिस्तानी खलाशी उत्स्फूर्तपणे व बेंबीच्या देठापासून मग घोषणा देतात… ‘हिंदुस्थान झिंदाबाद’!

समुद्रोल्लंघन करून या घोषणेचा निनाद जगभर पोहोचतो आणि जगही म्हणते, इंडिया इज इंडिया आफ्टरऑल… भारत तो भारत ही है!
हिंदी महासागरातील एडनच्या आखाताजवळ अल अंबर या इराणी जहाजाचे अपहरण नऊ सोमालियन लुटारूंनी केले आणि ही खबर भारतीय नौदलाला मिळाली. भारतीय नौदलाने 29 मार्च रोजी जहाजाची कोंडी केली. इराणी जहाजातील 23 पाकिस्तानी खलाशांना तर नौदलाने मुक्त केलेच; पण नऊ समुद्री चाच्यांनाही जेरबंद केले. आता सारे पाक खलाशी सुखरूप आहेत आणि कृतज्ञता व्यक्त करायलाही ते विसरलेले नाहीत. या पाकिस्तान्यांनी त्यासाठी एक खास व्हिडीओही केला. तो आता व्हायरल होत आहे.

या व्हिडीओत पाक खलाशांचा प्रमुख म्हणतो, माझे नाव अमीर खान. मी अपहृत जहाजाचा मास्टर होतो. आम्ही इराणहून येत होतो. तेव्हा लुटारूंनी आमच्या जहाजाचे अपहरण केले. सगळे संपलेले आहे, असे आम्हाला वाटत असतानाच 29 मार्च रोजी दुपारी 3 वाजता भारतीय नौदल फरिश्त्याप्रमाणे दाखल झाले. नौदलातील या जवानांनी रात्रभर संघर्ष केला. आम्हाला मुक्त केले. भारतीय नौदलाचे आभार… हिंदुस्थान झिंदाबाद!

हेही जाणून घ्या…

– आयएनएस सुमेधा आणि आयएनएस त्रिशूल या भारतीय नौदलाच्या 2 युद्धनौकांनी 12 तास हे ऑपरेशन राबवले.
– भारतीय नौदलाने यापूर्वी जानेवारीतही 19 पाकिस्तानी खलाशांना अशाच एका संकटातून वाचविले होते.

Back to top button